6 दहशतवादी ठार, 2 जवान शहीद
काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मंजकोट भागातील ग्लुटी गावात लष्कराच्या चौकीवर तैनात असलेल्या जवानावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. तर जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर लष्कराने 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर लष्कराने दहशतवादविरोधी अभियान सुरू केले. यावेळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
जिल्ह्यातील फ्रिसल चिन्निगाम भागात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली.जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडेच अनेक दहशतवादी घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी 27 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील गंडोह, भदरवाह सेक्टरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. गेल्या महिन्यात, 9 जूनच्या संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यात्रेकरूंनी भरलेली बस खड्ड्यात पडली, त्यात किमान नऊ जण ठार आणि 33 जण जखमी झाले.
अकोल्यातील जवानाला २४ व्या वर्षी वीरमरण

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करताना अकोला जिल्ह्यातील २४ वर्षीय जवान प्रवीण जंजाळ शहीद झाले. ही बातमी मिळाल्यानंतर जंजाळ यांच्या मोरगाव भाकरे या गावावर शोककळा पसरली. प्रवीण जंजाळ २०१९ साली सैन्य दलात भरती झाल्याचे सांगितले जाते. मागच्याच वर्षी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.
