अनिल ठाणेकर

 

 

ठाणे : काही दिवसांपूर्वी नौपाडा आणि पाचपाखाडीतील सुमारे दहा सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रकल्पांना मार्गी लावल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी गेली १२ वर्षे रखडलेल्या प्रशांत नगर येथील एसआरए प्रकल्पातील ३५० कुटुंबांना दिलासा दिला आहे. नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत संबंधित विकासकाला १५ ऑगस्टचा अल्टिमेटम देण्यात आला असून चार महिन्यांचे भाडे रहिवाशांना अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे.
प्रशांत नगर येथील श्री स्वामी समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्था या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विकासक हरीश दौलतानी यांच्या दिरंगाईमुळे योजनेतील ३५० कुटुंबे गेली १० ते १२ वर्षे हक्काच्या घरापासून वंचित आहेत. तसेच विकासकाकडून त्यांचे घरभाडेही थकले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तर या वर्षी मार्च महिन्यात घरे देण्याचे कबूल करण्यात आले होते, मात्र अद्याप विकासकाकडून चालढकल होत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी यापूर्वी दोनवेळा एसआरए अधिकारी, विकासक आणि रहिवासी यांच्या संयुक्त बैठका घेतल्या होत्या, मात्र त्यावेळी कबूल केल्याप्रमाणे विकासकाला रहिवाशांना घरे उपलब्ध करून देता आली नाहीत. अखेर काल मानपाडा येथील एसआरए प्राधिकरण कार्यालयात आमदार संजय केळकर आणि प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विकासक हरेश दौलतानी, अर्थ सहाय्य करणाऱ्या आयआयएफएल कंपनीचे आकाश तोमर, माजी नगरसेवक सूनेश जोशी, श्री स्वामी समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, प्राधिकरणाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
आमदार संजय केळकर यांनी या बैठकीत विकासकाने आजवर केलेल्या दिरंगाईचा पाढा वाचला. दोनवेळा तारखा देऊनही विकासकाला रहिवाशांना घरे देता आलेली नसून त्यांचे भाडेही थकवले आहे. त्यामुळे या बैठकीत ठोस आणि कठोर निर्णय घेण्याची गरज श्री.केळकर यांनी व्यक्त केली. प्राधिकरणाचे सीईओ यांनी देखील ही बैठक अखेरची असल्याचे सांगून १५ ऑगस्टपर्यंत विकासकाने रहिवाशांचे चार महिन्यांचे भाडे अदा करावे, तसेच इमारतीचे कामही सुरू करावे, असे निर्देश दिले. याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विकासकाला १५ ऑगस्टचा अल्टिमेटम दिला असल्याचे सांगितले. विकासकाने त्यानंतरही टाळाटाळ केली तर १६ ऑगस्टपासून विकासकावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येईल तसेच नवीन विकासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे निर्देश सीईओंनी दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रहिवाशांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचेही ते म्हणाले. आमदार केळकर यांचा पाठपुरावा आणि समन्वय तसेच प्राधिकरणाची कठोर भूमिका यामुळे विकासक आणि अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीकडून निर्देशांचे पालन करण्याचे कबूल करण्यात आले असल्याने या प्रकल्पाला वेग येण्याची चिन्हे आहेत. लवकरच रहिवाशांना हक्काची घरे आणि थकलेले भाडे मिळणार असल्याने रहिवाशांनी श्री.केळकर यांचे आभार मानले आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *