माथेरान : डोंगर द-यांना आव्हान देत निसर्गाची विविध रूपे अन नेरळ स्टेशन पासून जवळपास अडीच हजार फूट उंचीवर घेऊन जाणारी माथेरानची राणी अर्थातच मिनीट्रेन हे एकमेव आकर्षण पर्यटकांना माथेरान कडे भुरळ घालत असते.पावसाळ्यात नेरळ ते माथेरान दरम्यान ही सुविधा चार महिने बंद असते. परंतु अमन लॉज ते माथेरान या दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर मिनीट्रेनची शटल सेवा अविरतपणे कार्यरत असते. त्यातच याठिकाणी ई रिक्षाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळेच इथे खऱ्या अर्थाने सद्यस्थितीत पर्यटकांचा ओघ पावसाळ्यातील सुट्ट्यांचे दिवस वगळता मोठया प्रमाणावर वाढलेला दिसत आहे.मिनीट्रेनच्या शटल सेवेत केवळ तीन बोग्या द्वितीय श्रेणी साठी आणि एक बोगी प्रथम दर्जासाठी असल्याने तसेच फेऱ्याची संख्या कमी असल्याने अनेकांना या शटल मधून प्रवास करणे तिकिटाअभावी मुश्कील बनते. भरघोस उत्पन्न देणाऱ्या या शटलच्या बोग्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत रेल्वे प्रशासनाची मानसिकता नसल्याने याचा नाहक त्रास पर्यटकांना सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा यासंदर्भात रेल्वेच्या अधिकारी वर्गाला निवेदने देऊनही काही साध्य झाले नाही. बाराही महिने पर्यटकांची रेलचेल वाढल्याने ज्यांना मिनीट्रेनची तिकीट उपलब्ध होत नाहीत ती मंडळी माथेरानच्या मिनीट्रेनची एक आठवण म्हणून रेल्वेच्या इंजिन सोबत आपले फोटो काढून घेण्यासाठी या गाडीच्या अंगाखांद्यावर झुलताना मोबाईल कॅमेऱ्यात फोटो काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *