नवी मुंबई : नवी मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच स्वच्छतेचे संस्कार रुजावेत व दिंडीसारख्या परंपरेच्या माध्यमातून त्यांना संस्कृतीची ओळख व्हावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दिंडी’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा महाअंतिम सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात प्रचंड जल्लोशात संपन्न झाला.
राजर्षी छ्त्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्रमांक 104, आंबेडकर नगर, रबाळे यांना बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते स्वच्छता दिंडी स्पर्धेत सर्वोत्तम सादरीकरणाबद्दल प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह 25 हजार पारितोषिक रक्कम व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, स्पर्धेच्या परीक्षक सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीम.किशोरी अंबिये, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे – पाटील, शिक्षणाधिकारी श्रीम.अरुणा यादव, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी वारकरी संप्रदायाच्या दिंडीचे मूर्तीमंत दर्शन घडविणा-या विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून आपले लहानपण आठवल्याचे सांगत स्वच्छतेचा संदेश देणारी ही मुले उदयाचे नवी मुंबईचे खांब असल्याने नवी मुंबईचा स्वच्छतेतील नावलौकिक वाढत राहील असा विश्वास व्यक्त केला.
अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी स्वच्छता दिंडी स्पर्धेच्या रुपाने विष्णुदास भावे नाटयगृहाला पंढरीचे रुप आल्याचे सांगत महाअंतिम फेरीतील 21 शाळांच्या दिंडीत सहभागी 21 विठ्ठल रखुमाईचे दर्शन झाल्याचा आनंद व्यक्त केला. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक, नातेवाईक, शेजारी यांच्यापर्यंत कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंध असे स्वच्छतेशी संबधित संदेश पोहचतील व त्यांच्या वर्तणुकीत स्वच्छतेला पूरक बदल होतील असेही त्यांनी सांगितले.
महाअंतिम फेरीच्या परीक्षक सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीम. किशोरी अंबिये यांनी प्रत्येक शाळांचे सादरीकरण इतके अप्रतिम होते ही एकदाही जांभई आली नाही अशी मिश्कील टिप्पणी करीत विद्यार्थ्यांच्या मनात दिंडीसारख्या लोकपरंपरेची रुजवात करतानाच त्यांच्यातील कलागुणांची जोपासना करण्याचेही उत्तम काम नवी मुंबई महानगरपालिका करीत असल्याबद्दल कौतुक केले.
क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने, घनकचरा व्यवस्थापन विभाग व शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने, नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरशालेय दिंडी स्पर्धा’मध्ये प्राथमिक फेरीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 46 व खाजगी 45 शाळांनी अशाप्रकारे एकूण 91 शाळांतील 4 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभागी घेत हा उपक्रम यशस्वी केला.
विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेने आपापल्या क्षेत्रीय स्तरावर ‘स्वच्छता दिंडी’ आयोजित केली होती व त्याची गुगल लोकेशन नमूद असलेली छायाचित्रे स्पर्धेचा अर्ज भरताना महानगरपालिकेच्या सोशल मिडीया हँडलला टॅग करुन सादर केली होती.
त्यानुसार दाखल 91 शाळांची प्राथमिक फेरी 5 व 6 ऑगस्ट रोजी विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे विनारंगभूषा व वेशभूषा पार पडली. त्यामधून 21 शाळांची निवड प्राथमिक फेरीचे परीक्षक सुप्रसिध्द नाटय व मालिका कलावंत श्री.कुणाल मेश्राम यांनी महाअंतिम फेरीसाठी केली. या महाअंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द सिने, नाटय व मालिका अभिनेत्री श्रीम. किशोरी अंबिये यांनी केले.
या स्पर्धेमध्ये सहभागी शाळांनी ‘स्वच्छता’ विषयांतर्गत – कचऱ्याचे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी, खारफुटीचे (Mangrove) संवर्धन, जलस्त्रोत (वॉटरबॉडी) स्वच्छ्ता आणि संवर्धन, माझी वसुंधरा उपक्रम, नवी मुंबई शहर सुशोभिकरण अशा सहा मुद्दयांना अनुसरून 7 मिनीटांचे सादरीकरण केले. यामध्ये भजन, कीर्तन, पोवाडा, भारूड, वारीतील रिंगण, वारीतील विशिष्ट नृत्य, सामाजिक संदेश देणारा अन्य सांस्कृतिक कलाप्रकार अशा विविध प्रकारे सादरीकरण करण्यात आले.
महाअंतिम फेरीसाठी विष्णुदास भावे नाटयगृहात वारकरी परंपरेचे दर्शन घडेल अशी वातावरण निर्मिती सजावटीव्दारे करण्यात आली होती. सकाळी 11 वाजता महाअंतिम फेरीची सुरुवात होऊन 21 शाळांचे सादरीकरण करण्यात आले. नाटयगृहामध्ये आळंदी, देहू, पैठण, जळगाव अशी वारकरी परंपरेशी निगडीत दरवाजे बनविण्यात आले होती व प्रत्येक शाळेच्या दिंडीला सभागृहात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट दरवाजे नेमून देण्यात आले होते. यावेळी संपूर्ण स्पर्धेची माहिती देणारी ध्वनीचित्रफित प्रदर्शित करण्यात आली.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *