डोंबिवली : डोंबिवलीतील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर बांधण्यात येतात. या कालावधीत रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशावरून मंगळवारी कृष्ण अष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावरून वळविण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौकात भाजपतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. सर्वाधिक वर्दळीचा फडके रस्ता आणि रेल्वे स्थानक भागाशी निगडित हा चौक आहे. या चौकात मंगळवारी वाहन कोंडी होऊ नये म्हणून फडके रस्त्याने बाजीप्रूभ चौक भागात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फडके रस्त्यावरील महावितरण कार्यालय आणि कुळकर्णी ब्रदर्स येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने फडके रस्त्यावरून डावे वळण घेऊन अंबिका हॉटेल, के. बी. विरा शाळेवरून पी. पी. चेंबर्स मॉल किंवा पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावरून इच्छित स्थळी जातील.
मानपाडा रस्त्यावरील चार रस्ता पाटणकर चौक येथे फडके वॉच दुकानाच्या बाजुला मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद रस्त्याने जोधपूर स्वीट ते गिरनार चौक भागातून चार रस्ता भागात येणाऱ्या वाहनांना अडथळा होणार आहे. त्यामुळे टंडन रस्त्याने, दत्तनगर भागातून राजेंद्र प्रसाद रस्त्याने चार रस्ता पाटणकर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गिरनार चौक येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने लेवा भवन सभागृह येथील छेद रस्त्याने किंवा दत्तनगर चौकातील टिपटॉप कॉर्नर म्हाळगी चौकातून दत्तनगर चौकातून, संगीतावाडी, प्रगती महाविद्यालय दिशेने इच्छित स्थळी जातील.
मानपाडा रस्ता, टिळक चौकाकडून चार रस्त्यावरून दत्तनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पाटणकर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने संत नामदेव पथ, मानपाडा रस्ता, ग्रीन चौक, चिपळूणकर मार्गे इच्छित स्थळी जातील.
डोंबिवली पश्चिमेत माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाकडून दिनदयाळ रस्त्याने सम्राट चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दिनदयाळ रस्त्यावरील गणपती मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गणपती मंदिराजवळ डावे वळण घेऊन जी. एन. गॅरेज, येलोरा सोसायटीकडून सम्राट हॉटेल चौकाकडून रेतीबंदर, माणकोली पूल दिशेने जातील. रेतीबंदर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचापाडा भागातून सम्राट चौकाकडे येणाऱ्या वाहनांना सम्राट चौक व्यंकटेश सोसायटी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सम्राट चौकात डावे वळण घेऊन नाना शंकरशेठ मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता किंवा महात्मा फुले रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील.
अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या प्रवेश बंदीमधून मुक्तता आहे. माणकोली पूल दिशेने जाणारी वाहने दिनदयाळ रस्त्यावरून धावतात. त्यामुळे रेतीबंदर चौक, गुप्ते रस्ता, सम्राट चौक भागात अभूतपूर्व वाहन कोंडी होण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. या तिन्ही ठिकाणी पुरेसा वाहतूक पोलीस, पोलीस बंदोबस्त ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे.