लोकमान्यनगर परिसरातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेले समाज मंदिर, वाचनालय व अद्ययावत व्यायाम शाळेचे लोकार्पण !
अनिल ठाणेकर
ठाणे : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर व शास्त्रीनगर परिसरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून होत असलेल्या विविध विकास कामांचा शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी लोकार्पण व भुमिपूजन आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी नगरसेविका आशा डोंगरे, विधानसभा शहरप्रमुख राजेंद्र फाटक, विधानसभा सचिव संदिप डोंगरे, विभागप्रमुख रामचंद्र गुरव, भगवान देवकते, संतोष ढमाले, विभाग समन्वयक राजेंद्र कांबळे, महिला विभाग संघटक.टिना डिसोझा, शाखाप्रमुख रमेश सांडभोर, सुनिल शिंदे, पराग सावके तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शास्त्रीनगर व आजुबाजूच्या परिसरातील रहिवाश्यांसाठी फिश मार्केट उपलब्ध नसल्यामुळे मासेविक्री करणारे व्यापारी रस्त्यावरच आपले व्यवसाय करीत होते. त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत होते. या परिसरातील रहिवाश्यांनी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांना शास्त्रीनगर नाका येथे नविन फिश मार्केट उभारण्यासंदर्भात विनंती केली असता आमदार प्रताप सरनाईक यांनी विशेष निधीतून तरतुद केली असून आज शास्त्रीनगर नाका येथे उभारण्यात येणार्या फिश मार्केटचे भुमिपूजन करण्यात आले. तसेच लोकमान्यनगर पाडा नं. ३ येथील हनुमान क्रिडा मंडळाच्या जागेत वाचनालय आणि समाज मंदिर त्याचप्रमाणे लोकमान्यनगर पाडा नं. २ येथील समृध्दी महिला बचत गट केंद्र येथे अद्ययावत व्यायाम शाळा आमदार निधीतून उभारण्यात आले आहे. त्याचेही आज लोकार्पण करण्यात आले. परिसरातील विद्यार्थ्यांना या वाचनालयाचा उपयोग होणार असून समाज मंदिराचा तेथील रहिवाश्यांना लाभ घेता येणार आहे. तसेच अद्ययावत व्यायाम शाळेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना खास करून तरूण पिढीला आपले शरीर सृदुढ ठेवण्यास मदत होईल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. शास्त्रीनगर नाका येथे नविन फिश मार्केट उभारण्यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया झालेली असून आज भुमिपूजन झाल्यामुळे लवकरच या कामाला सुरूवात होत असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.
००००
