४२ जिल्ह्यांतील ४००हून अधिक खेळाडूंचा सहभाग
पुणे: सोलापूर येथे २८ व २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे संयोजन निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर यांच्याकडे सोपविण्यात आले असून ४२ जिल्ह्यांतील ४००हून अधिक महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तीन वेळा किताब पटकावलेल्या भाग्यश्री फंड हिच्याकडे चौथ्या विजेतेपदासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे.
निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, संस्थेच्या संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघचे अध्यक्ष रामदास तडस व सरचिटणीस योगेश दोडके यांनी माहिती दिली. स्पर्धा सोलापूरमधील हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
स्पर्धेसाठी ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके देण्यात येणार असून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे.
भाग्यश्रीसमोर अमृता पुजारी, प्रगती गायकवाड, अंकिता फटाले व वेदांतिका पवार यांचे आव्हान असणार आहे. भाग्यश्रीने स्पेनमध्ये झालेल्या २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असून थायलंड येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. गतवर्षीच्या अंतिम लढतीत तिने अमृतावर मात करत किताब पटकावला होता.
स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी वडील सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ २०२३ मध्ये निर्झरा केअर फाऊंडेशनची स्थापना केली. सोलापूर जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंना दर्जेदार सुविधा व व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आश्वासन देत आयोजकांना पाठिंबा दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *