स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, रायगड जि. प.च्या वतीने हुतात्मादिनाचे आयोजन

महाड : ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा एल्गार झालेला असतानाच महाडमध्येदेखील क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर १९४२ ला ब्रिटिशांना चले जाव करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या किसान मोर्चावर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. या दिवसाचे स्मरण करण्याकरिता आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी महाडमध्ये १० सप्टेंबरला हुतात्मादिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही ८२ व्या हुतात्मादिनाचे आज आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महाड शहरात स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, महाड नगर परिषद, रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या हुतात्मादिनाचे आयोजन करण्यात येते. महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिल्यानंतर त्याचे पडसाद महाडमध्येही उमटले. १० सप्टेंबर १९४२ ला महाडमध्ये महाड तहसील कचेरी ताब्यात घेण्यासाठी किसान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर शहरातील पिंपळपार या ठिकाणी तात्कालीन इंग्रज सरकारने अंधाधुंद असा गोळीबार केला. या बेछूट गोळीबारामध्ये कमलाकर दांडेकर या विद्यार्थ्यासह वसंत दाते, अर्जुन भोई कडू, विठ्ठल बिरवाडकर, नथू टेकावले या भारत मातेच्या पाच वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या स्मृती पुढील पिढीला स्मरणात रहाव्यात या उद्देशाने स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, महाड नगर परिषद रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने या दिनाचे आयोजन केले जाते.

हुतात्म्यांना वाहणार श्रद्धांजली

मंगळवार सकाळी ८.३० वाजता शाळा क्रमांक चार येथे या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्म्यांच्या तसबिरीला पुष्पमालिका व श्रद्धांजली अर्पण करून होणार आहे. या कार्यक्रमाला महाडचे आमदार भरत गोगावले, म्हाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांसह विविध सामाजिक संस्थांचे मान्यवर स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीयांतील आप्तगण, तसेच महाडमधील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

शाळा क्रमांक चार येथून मुख्य बाजारपेठेतील विविध चौकांमध्ये असलेल्या हुतात्म्यांच्या नामफलकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण केल्या जातील. या कार्यक्रमाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक येथे होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *