ठाणे : जागतिक हृदय दिनानिमीत्ताने रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रिमियम व ज्युपिटर हॉस्पीटल फाऊंडेशन यांच्या वतीने ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये देणगीदार व हृदयावर उपचार घेतलेले बालक व त्यांचे पालक यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.
जन्मत: हृदयरोग असलेल्या बालकांना रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रिमियम व ज्युपिटर हॉस्पिटल फाउंडेशनने देणगीदारांच्या सहकार्याने उपचारासाठी मदतीचा हात दिला आहे. अशा देणगीदारांचा सत्कार व हृदयरोग शस्त्रक्रियेनंतर ठिक झालेल्या बालक-पालकांची भेट असा हृदयस्पर्शी कार्यक्रम रविवार, २९ सप्टेंबर रोजी संपन्न झाला.
भारतात दरवर्षी दोन लाखावर बालक जन्मत: हृदयात छिद्र किंवा हृदयाशी संबंधित आजारानी जन्माला येतात. त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. रोटरी क्लब ऑफ प्रिमियमने बिर्ला फाऊंडेशन व इतर देणगीदारांच्या मदतीने व ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने ज्यांच्या पालकांना या शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नाही, त्यांच्या बालकांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया केली जाते. आत्तापर्यंत 400 पेक्षा जास्त बालकांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रिमियमच्या अध्यक्षा डॉ. सोनल बांगडे यांनी दिली.
रोटरी ३१४२ चे गर्व्हनर दिनेश मेहता म्हणाले की, रोटरीने नेहमीच समाजातील वंचितांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ज्युपिटर हॉस्पीटलच्या सहकार्याने रोटरी क्लबच्या माध्यमातून जन्मजात हृदयरोग असलेल्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. समाजाच्या या देणगी व सहकार्यातून असे अनेक जीव वाचले जात आहेत.
ज्युपिटर हॉस्पीटलचे पेडीयाट्रिक हार्ट सर्जन डॉ. श्रीनिवास म्हणाले की, जन्मजात हृदय रूग्ण होण्याची शक्यता जवळच्या रक्तसंबंधातील व्यक्तींमध्ये लग्न केल्याने दिसून येते. हृदयरोग घेऊन जन्माला आलेल्या बालकांवर लहानपणीच शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये या शस्त्रक्रिया केल्या जातात.
यावेळी रोटरी इंटरनॅशनलचे माजी डायरेक्टर अशोक महाजन, रोटरी जिल्हा समन्वयक पल्लवी सुळे, ज्युपिटर हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय ठक्कर, डॉ. बच्छाव तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी व उपचार करून ठिक झालेल्या बालकांचे पालक हे त्यांच्या पाल्यासह या कृतज्ञता सोहळ्याला उपस्थित होते. या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य केलेल्या देणगीदारांना धन्यवाद देण्यासाठी हे पालक व रोटरी सदस्य आले होते.