नवी मुंबई: नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना राबवितांना प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकला प्रतिबंध करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या करिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार विभाग कार्यालय पातळीवर पथके तयार करण्यात आली असून याकडे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार तसेच दोन्ही परिमंडळांचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अनुक्रमे डॉ. अजय गडदे व  सुनिल वारुळे बारकाईने लक्ष देत आहेत.
या अनुषंगाने 10 व 11 डिसेंबरला विभागीय कार्यक्षेत्रात धडाकेबाज प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात आल्या असून 1 लक्ष 10 हजाराहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे व 38 किलो 850 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक माल जप्त करण्यात आलेला आहे.
यामध्ये बेलापूर विभागात 5 दुकानावर कारवाई करीत 30 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे व 7 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे. अशाच प्रकारे नेरुळ विभागात 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली व 2 किलो 500 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. वाशी विभागात 2 दुकानदारांकडून 10 हजार दंड वसूली व 2 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. तुर्भे विभागातही 3 दुकानदारांकडे प्रतिबंधात्मक प्लास्टिक सापडल्याने 8 किलो 200 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले व 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. परिमंडळ 1 च्या भरारी पथकानेही 1 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त करीत 5 हजार दंडात्मक रक्कम वसमूल केली. यामध्ये परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या नियंत्रणाखाली विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी अनुक्रमे डॉ. श्रीकांत तोडकर, श्री. जयंत जावडेकर, श्री. सागर मोरे, श्री. प्रबोधन मवाडे व त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी पथकांनी कार्यवाही केली.
अशाचप्रकारे परिमंडळ 2 विभागात उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात आल्या त्यामध्ये परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने 5 हजार दंड वसूली व 700 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले.  कोपरखैरणे विभागात 3 दुकानांवर कारवाई करीत 15 हजार दंड वसूली व 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. घणसोली विभागात एका दुकानदाराकडून 6 किलो प्लास्टिक जप्त करुन 10 हजार दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली. ऐरोली विभागात एकात दुकानावर कारवाई करत 5 हजार दंडात्मक वसूली व 3 किलो 450 ग्रॅम प्लास्टिक साठा जप्त्‍ करण्यात आला. दिघा विभागातही 5 किलो प्लास्टिक साठा जप्त करुन 5 हजार दंडात्मक रक्कम वसूल करएण्यात आली. या कारवाईमध्ये विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी अनुक्रमे श्री. सुनिल काठोळे, श्री. संजय तायडे, श्री. अंकुश जाधव, श्री. भरत धांडे व त्यांच्या  विभागातील सहकारी अधिकारी, कर्मचारी यांनी पतिबंधात्मक कारवाईत सहभाग घेतला.
सलग दोन दिवस राबविण्यात आलेल्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांमध्ये 38 किलो 850 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक सापडले असून त्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा मोठया प्रमाणावर समावेश असल्याचे आढळून आले आहे. आपले नवी मुंबई शहर पर्यावरणाला व मानवी जीवनाला घातक ठरणा-या प्रामुख्याने एकल वापर प्लास्टिकपासून मुक्त असावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिका एका बाजूने जनजागृती करीत आहे व त्यासोबतच विशेष मोहिमा राबवून प्रतिबंधात्म प्लास्टिक आढळल्यास कारवाई करीत आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी एकल वापर प्लास्टिकला आपल्या जीवनातून हद्दपार करावे आणि कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *