डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, पाटकर रस्ता, नेहरू रस्ता हे सर्वाधिक वर्दळीचे भाग म्हणून ओळखले जातात. या भागातील रस्ते, चौक वाहने, नागरिकांसाठी पूर्णपणे खुले असले पाहिजेत या विचारातून पालिकेच्या फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकापासून १५० मीटर पर्यंत एक सीमारेषा आखून दिली आहे. या सीमारेषेच्या आत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कायदेशीर, दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फ, ग प्रभाग कार्यालयाकडून रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्याची मोहीम सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असते. मागील अनेक महिन्यांच्या कारवाईनंतर ग, फ प्रभाग हद्दीतील बहुतांशी फेरीवाले सततच्या कारवाईमुळे अन्य भागात व्यवसाय करण्यासाठी निघून गेले आहेत. काही फेरीवाले रेल्वे स्थानक भागातून हटण्यास तयार नाहीत. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, चौक नागरिकांसाठी पूर्णपणे खुले पाहिजेत असे आदेश यापूर्वीच दिले आहेत. या आदेशाप्रमाणे फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आपल्या फ प्रभाग हद्दीतील डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरपर्यंत सफेद पट्टे आखून घेतले आहेत. या सफेद पट्ट्यांच्या आत एकाही फेरीवाल्याने व्यवसाय करू नये. ही सीमारेषा मोडून कोणी फेरीवाल्याने व्यवसाय केला तर त्यांच्यावर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. फेरीवाल्यांसाठी या सीमारेषा इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक, फडके रस्ता, नेहरू रस्ता भागात मारण्यात आल्या आहेत. रामनगर, राजाजी रस्ता, शिवमंदिर रस्ता परिसर ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी फेरीवाला मुक्त केला आहे. फ आणि ग प्रभागाची फेरीवाला हटाव पथके सकाळपासून रेल्वे स्थानक भागात तैनात राहत असल्याने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त होत आहे.
