भारताचा शेजारी देश नेपाळ काही महिन्यांपासून भारताला मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा करत आहे. नेपाळ विद्युत प्राधिकरणा (एनई) नुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये नेपाळने 13 अब्ज नेपाळी रुपये किंवा सुमारे 815 कोटी भारतीय रुपयांची वीज निर्यात केली आहे. नेपाळ गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात भारताला अतिरिक्त वीजपुरवठा करत आहे.
‘एनईए’ अधिकाऱ्यांच्या मते, या पाच महिन्यांमध्ये भारताला निर्यात केलेल्या विजेचा सरासरी दर 7.39 नेपाळी रुपये म्हणजेच अंदाजे 4.63 भारतीय रुपये प्रति युनिट इतका आहे. द्विपक्षीय मध्यम मुदतीच्या वीज विक्री करारांतर्गत नेपाळ हरियाणा आणि बिहारला दैनिक ऊर्जा विनिमय आणि रिअल टाईम बाजार किमतीवर वीज विकते. या कराराअंतर्गत विकल्या गेलेल्या विजेतून नेपाळला अंदाजे 815 कोटी रुपये मिळाले. हे सर्व व्यवहार भारतीय चलनात झाले. हिवाळ्याच्या आगमनाबरोबरच कोरडा हंगाम आला आहे. त्यामुळे नेपाळने आता भारताला वीजपुरवठा करणे थांबवले आहे. आता नेपाळने भारताकडून वीज आयात करण्यास सुरुवात केली आहे. सध्या नेपाळअंतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारताकडून 300 मेगावॉट वीज आयात करतो. नेपाळमधील बहुतेक वीज प्रकल्प हे ‘रन-ऑफ-रिव्हर’ प्रकारचे आहेत, ज्यांना हंगामी चढउतारांचा सामना करावा लागतो. ‘एनई’ अधिकाऱ्यांच्या मते नेपाळने या वर्षी भारताला अधिक वीज निर्यात करण्याची योजना आखली होती; परंतु सप्टेंबरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 456 मेगावॉटच्या तामाकोशी जलविद्युत प्रकल्पाला झालेल्या हानीमुळे तसे करता आले नाही.
या वर्षापासून नेपाळने भारताच्या ट्रान्समिशन लाइनद्वारे बांगलादेशला 40 मेगावॅट वीज निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. वीज विक्री करारांतर्गत, नेपाळला आतापर्यंत 28 प्रकल्पांमधून निर्माण झालेली 941 मेगावॉट वीज भारतीय बाजारपेठेत विकण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.