वन मंत्री गणेश नाईक यांचे भाकीत

 

बदलापूर: गुणी लोकप्रतिनिधींच्या मागे उभे राहणे माझे काम आहे. तसेच ज्यांच्यात धमक असते ते कधीही माजी होत नाहीत. कपिल पाटील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले, खासदार झाले केंद्रीय मंत्री झाले. भविष्यातही ते पुन्हा खासदार आणि केंद्रीय मंत्री होतील. तसेच शिवसेनेचे वामन म्हात्रे हे बदलापूरचे महापौर होतील, असे भाकीत राज्याचे नवनियुक्त वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. भाजपचे कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त नाईक बदलापूर शहरात आले होते. त्यानिमित्त नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भाकित केली. गेल्या काही महिन्यात बदलापुरात शिवसेना विरुद्ध भाजपचे काही नेते तसेच भाजप विरुद्ध भाजप नेते असा वाद सुरू आहे. त्यात नाईक यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते.
भाजपाचे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बदलापूर येथे झालेल्या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हेदेखील उपस्थित होते. यावेळी दोघांनी आमदार म्हात्रे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी म्हात्रे बंधूंवर स्तुती सुमाने उधळली. वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना आपण वामन म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत असे स्पष्ट केले. गुणी व्यक्तींच्या मागे उभे राहणे माझे काम आहे असे सांगत नाईक यांनी वामन म्हात्रे आणि कपिल पाटील यांचे समर्थन केले. तसेच कपिल पाटील भविष्यात पुन्हा खासदार आणि केंद्रात मंत्री होतील अशी ही आशा त्यांनी व्यक्त केली. सोबतच बदलापूर महापालिका झाल्यानंतर वामन म्हात्रे त्याचे महापौर होतील असाही दावा नाईक यांनी केला. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर बदलापुरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *