जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती
कल्याण : कॅन्सरविरोधात जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘रन फॉर फाईट अगेन्स्ट कॅन्सर’ मॅरेथॉन टिटवाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. रेड स्वस्तिक सोसायटी, स्पर्श फाउंडेशन, स्पंदन फाउंडेशन, आणि आनंद होम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सामाजिक उपक्रमात टिटवाळा आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची प्रमुख उपस्थितीती या कार्यक्रमास लाभली होती. त्याचबरोबर कल्याणचे तहसीदार सचिन शेजाळ हे देखील यावेळी उपस्थित होते.
टिटवाळ्यातील महागणपती मंदिर प्रांगणातून सकाळी ६ वाजता या मॅरेथॉनची सुरुवात झाली. स्पर्धेसाठी ५ कि.मी. आणि ३ कि.मी. असे दोन गट तयार करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला. विशेषतः तरुण वर्गाचा उत्साह उल्लेखनीय होता. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते फॅल्ग दाखवत स्पर्धेस सुरुवात झाली.
मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोद नांदगावकर यांनी जनतेला संबोधित करत कॅन्सरविरोधातील लढाईत प्रत्येक व्यक्तीचा सहभाग किती महत्त्वाचा आहे यावर भर दिला. त्यांनी नागरिकांना सामाजिक जाणीव वाढवण्याचे आवाहन केले आणि आरोग्यासंबंधी जागरूक राहण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय यांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॅन्सर या आजाराची भयावह दुष्परीणाम हे सगळ्यांना माहिती व्हावेत त्याबाबत जनजागृती व्हावी तसेच जनतेने आपल्या आरोग्याबाबत सजग रहावे या हेतूने या कार्यक्रमाचे जे आयोजन करण्यात आले आहे ते उल्लेखनीय आहे असे सांगत जिल्हाधिकारी शिनगारे यांनी आयोजकांचे कौतुक केले. त्याचबरोबर कॅन्सरविरोधातला हा लढा हे एका – दुसऱ्याचे काम नसून जनतेने देखील अश्या सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लोकांसोबत एकत्र आले पाहिजे असे देखील ते म्हणाले.