माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी

कल्याण : राज्य शासनाकडून कल्याण पश्चिमेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या कामगार कल्याण केंद्राच्या इमारतीसाठी आगामी अर्थसंकल्पात 5 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. नरेंद्र पवार यांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेत यासंदर्भातील निवेदन सादर केले.
राज्य शासनाकडून सर्वे नं. ६२ खडकपाडा, कल्याण पश्चिम या भूखंडावर कामगार कल्याण केंद्र मंजूर केले आहे. महाराष्ट्र कामगार मंडळ हे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य करणारी शासन निर्मित संस्था आहे. राज्यामध्ये एकूण २३३ कामगार कल्याण केंद्र असून कामगार कुटुंबियांच्या अंतर्गत आणि बहिर्गत विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जातात. ज्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा आणि सांस्कृतिक आदींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणात मंजूर झालेल्या कामगार कल्याण केंद्राची इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याची गरज माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात (२०२५-२०२६) कामगार कल्याण केंद्रासाठी 5 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी नरेंद्र पवार यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे. त्यावर कामगार मंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *