विज्ञानमंच अंतर्गत उपक्रम
ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि मराठी विज्ञान परिषद, ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांकरिता स्थापन करण्यात आलेल्या विज्ञानमंचाच्या माध्यमातून २७८ विद्यार्थी व ६५ शिक्षक यांनी नुकतीच नेहरू तारांगण व नेहरू विज्ञान केंद्र यांना भेट दिली.
या भेटीत विद्यार्थ्यांनी नेहरु तारांगण येथे प्रदर्शन कक्षाला भेट दिली. तेथे ग्रह, तारे, उपग्रह आणि खगोलशास्त्र यांच्याशी संबंधित उपकरणे पाहिली. तसेच, सौरमालेची रचना, कृत्रिम उपग्रह व ग्रहांवरील स्थिती याची माहिती घेतली. केंद्राच्या डोम थिएटरमधील सजीव खगोलशास्त्रीय शोचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी वेगळाच
ठरला. तेथे त्यांना आकाशातील तारकासमूह याचा अनुभव घेता आला. त्यानंतर, विद्यार्थ्यांनी नेहरू विज्ञान केंद्र येथे सायन्स ओडिसी शो, थ्री डी शो, एसओएस शो पाहिले. तसेच, विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विज्ञानातील गमती -जमतीद्वारे विज्ञानाचे सिद्धांत, नियम, संकल्पना यांची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.
नेहरू तारांगण आणि नेहरू विज्ञान केंद्राच्या या भेटीचे आयोजन उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे, शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर, गटाधिकारी संगिता बामणे यांनी या भेटींचे सूक्ष्म नियोजन केले. रवींद्र पाटील, चेतन देवरे, मुश्ताक पठाण यांनी या भेटीचे समन्वयन केले. या भेटीसाठी विद्यार्थ्यांसोबत आरोग्य विभागाचे पथक होते. तसेच, टीएमटीने बस गाड्यांची व्यवस्था केली.