भारतीय कार मार्केट अत्यंत संवेदनशील आणि स्पर्धात्मक मानले जाते. या उद्योगात काही नामवंत कंपन्या संयुक्तपणे उत्पादन करत असताना होंडा आणि निस्सान या कंपन्यांचे एकत्र येणे बाजारात वाढणाऱ्या स्पर्धेमुळे आणि उत्पादनात अपेक्षित नावीन्यपूर्ण सुधारणांच्या दृष्टीने औत्सुक्याचे ठरेल. या आघाडीच्या ब्रँड्सनी जगभरात मजबूत उपस्थिती प्रस्थापित केली आहे. त्यांचे एकत्र येणे भारतीय कार उद्योगामध्ये कोणते तरंग उमटवणार?
भारतात 35 हून अधिक जागतिक आणि भारतीय कार ब्रँड सक्रिय आहेत, काही नामवंत कंपन्या संयुक्तपणे उत्पादन करत असताना होंडा आणि निस्सान या कंपन्यांचे एकत्र येणे हे बाजारात वाढणाऱ्या स्पर्धेमुळे आणि उत्पादनात अपेक्षित नावीन्यपूर्ण सुधारणांच्या दृष्टीने औत्सुक्याचे ठरेल. जपानी कार निर्माते नावीन्यपूर्णतेने, विश्वासार्हतेने आणि कार्यक्षमतेने जागतिक ऑटोमोटिव्ह मार्केटवर वर्चस्व गाजवतात. होंडा आणि निस्सानसारख्या आघाडीच्या ब्रँड्सनी जगभरात मजबूत उपस्थिती प्रस्थापित केली आहे. या कार उत्पादक कंपन्या उच्च दर्जाच्या, इंधन-कार्यक्षम आणि टिकाऊ वाहनांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. निस्सान इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आघाडीवर आहे, भारतीय कार बाजारात होंडाच्या साहाय्याने इलेक्ट्रिक वाहने विक्रीला आणून प्रस्थापित उत्पादकांना स्पर्धा देण्याची कंपनीची जोरात तयारी चालू आहे. या दोन कंपन्यांच्या विलीनीकरण करारानंतर; स्थापन होणारी कंपनी ही टोयोटा आणि फोक्सवॅगन या दोन अग्रस्थानी असणाऱ्या जागतिक वाहननिर्मिती उद्योगांनंतर, तिसऱ्या क्रमांकाची वाहन निर्मिती कंपनी बनणार आहे. दोन्ही कंपन्यांनी जून 2025 पर्यंत हा करार पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. करारानुसार, दोन्ही कंपन्यांचे ऑगस्ट 2026 मध्ये सूचीकरणासाठी एक सामायिक होल्डिंग कंपनी स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.
भारतातील काही प्रमुख कार उत्पादक कंपन्यांमध्ये मारुती, ह्युंदाई, टाटा मोटर्स, महिंद्रा, होंडा, किया आणि रेनॉल्ट यांचा समावेश आहे. बाजारातील वाढती स्पर्धा ही विविध कंपन्यांची विविध मॉडेल्स बाजारात येण्यामागील मुख्य कारण आहे. उत्पादनाची निवड ही पूर्णपणे आपले प्राधान्य आणि बजेटवर अवलंबून असते. त्यामुळे खरेदीदारांपैकी विविध वर्गांना संभाव्य ग्राहक बनवण्यासाठी आणि आपल्या कंपनीची विक्री वाढवण्यासाठी कंपन्यांना विविध मॉडेल्स बाजारात आणावी लागत आहेत. त्याचबरोबर विविध वैशिष्ट्ये असलेले वाहननिर्मिती उद्योग ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संयुक्तपणे उत्पादनाचा निर्णय घेत आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन होंडा आणि निस्सान या नामवंत कार उत्पादकांनी संयुक्त उत्पादनाचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना स्टायलिश लूक, विश्वासार्ह इंजिने आणि तुलनेने परवडणाऱ्या किंमतीत गाड्या देणे, हे आजकाल या क्षेत्रात यशाचे सूत्र बनले आहे. त्याच धर्तीवर भविष्यकाळात होंडा आणि निस्सान या कार उत्पादक कंपन्यांना संयुक्तिकिकरणाद्वारे ग्राहकांच्या पसंतीला उतरतील, आधुनिक युगात शोभतील, समोर असलेल्या नामवंत उत्पादकांच्या आव्हानात्मक स्पर्धेला सामोरे जातील, कुठल्याही प्रकारच्या बाजारपेठेमध्ये निर्धोक चालतील अशी किफायतशीर वाहनांची उत्पादने, ग्राहकांसमोर जरूर ठेवावी लागतील.
भारतासारख्या विकसनशील देशामध्ये ऑटोमोबाईल बाजार वेगाने विस्तारत आहे. वाढत्या उत्पन्नामुळे, शहरीकरणामुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे हे क्षेत्र जपानी वाहन निर्मात्यांना त्यांच्या परवडणाऱ्या, विश्वासार्ह आणि इंधन-कार्यक्षम वाहनांच्या विक्रीच्या संधी देतात. होंडा अत्यंत लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे, जी भविष्यकाळात निस्सानबरोबर पर्यावरणपूरक मोबिलिटी सोल्यूशन्सच्या वाढत्या मागणीला सामोरे जाण्यासाठी हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर भर देऊ शकते. जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होत असल्याने हे विलीनीकरण भारतीय कार बाजारात प्रगत ईव्ही आणि हायब्रिड मॉडेल्स येण्याला कारणीभूत ठरु शकते.
भारतीय कार मार्केटमध्ये प्रत्येक गरजेसाठी एक कार आहे, म्हणजेच ग्राहकांच्या अपेक्षेनुसार गाड्यांच्या उत्पादनावर उत्पादक कंपन्यांनी भर दिला आहे. भारतासारख्या प्रगतशील देशात ही बाजारपेठ संधी आणि आव्हानांनी भरली असून अनेक कार ब्रँड हे बाजाराच्या विक्रीतील आपल्या सर्वात मोठ्या वाट्यासाठी स्पर्धा करतात. गेल्या महिन्यात जवळपास 3.51 लाख कार्सच्या विक्रीसह, 2024 च्या नोव्हेंबर महिन्याच्या विक्रीच्या तुलनेत या उद्योगात 5.5 टक्के वाढ झाली. यावरून कार उत्पादनासाठी भारतीय बाजाराचे महत्व लक्षात येईल. उत्पादनांच्या स्पेअर पार्टसची त्वरीत उपलब्धता, संपूर्ण देशात पोहोचलेले सेवाजाळे ही वैशिष्ट्ये उत्पादकांच्या विक्रीत मोलाची भर घालतात. त्यासाठी मारुती ही भारतातील प्रवासी कारसाठी विक्रीनंतरची सर्वोत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.
मारुती सुझुकीची ब्रेझा ही ऑगस्ट 2024 मध्ये भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली. तिने सब-4 सेगमेंटमध्ये सर्वोच्च स्पर्धक म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. भारतातील सर्वात मोठे कार लाइन-अप, विस्तीर्ण डीलर नेटवर्क आणि कारच्या अपवादात्मक विश्वासार्हतेसह मारुती सुझुकी 40 वर्षांहून अधिक काळ राज्य करत आहे. भारताच्या एकूण कार विक्रीमध्ये मारुती सुझुकीचा वाटा 40 टक्क्यांहून अधिक आहे. इतर कोणत्याही कार निर्मात्याला 20 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेचा वाटा मिळवता आलेला नाही. गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने 1,41,312 गाड्यांची विक्री केली. त्यामुळे त्याची वार्षिक विक्री 5.3 टक्क्यांनी वाढली. शिवाय, नेहमीप्रमाणे टॉप 10 कारच्या यादीत सर्वाधिक जागा मारुती कारने पटकावल्या आहेत. भारतातील सर्वाधिक काळ चालणारा आणि सर्वात यशस्वी परदेशी कार ब्रँड ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कार निर्माता कंपनी आहे.
अशा उत्पादकांसमोर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नव्याने आपली उत्पादने बाजारात उतरवणाऱ्या कंपन्यांना आपला जम बसवण्यासाठी त्या योग्यतेची उत्पादने आणि प्रभावी सेवा देणे अपरिहार्य ठरते. अशा नामवंत स्पर्धक कंपन्या बाजारात असताना येत्या काळात होंडा, निस्सान या कंपन्यांना हुशारीने काम करावे लागेल आणि त्यासाठी आपली विश्वासार्हता सिध्द करावी लागेल. विश्वासार्हते बरोबरच उत्कृष्ट मायलेज आणि स्वस्त देखभाल खर्च या गुणांमुळे भारतीय बाजारपेठेत विक्रीचे एक ठराविक उद्दिष्ट्य समोर ठेऊन आपले विशेष स्थान निर्माण करावे लागेल. आज याच दोन मुद्यांवरून बहुतेक कार निर्मात्यांची स्पर्धा चाललेली आढळून येते. होंडा आणि निस्सानच्या विलीनीकरणाच्या ताज्या घोषणेने बाजारात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, निस्सानच्या शेअर्समध्ये 24 टक्क्यांनी वाढ झाली. इलेक्ट्रिक वाहने आणि स्वायत्त तंत्रज्ञानासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये वेगाने बदलणाऱ्या उद्योगातील आव्हानांना सामोरे जाण्याचे कंपन्यांचे लक्ष्य आहे. होंडा आणि निस्सानच्या संभाव्य विलीनीकरणामुळे भारतीय कार उत्पादकांमध्ये स्पर्धा वाढू शकते आणि त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
दोन्ही कंपन्यांचा भारतीय बाजारपेठेत आधीच महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यांची मॉडेल्स सर्व विभागांमध्ये लोकप्रिय आहेत. होंडा आणि निस्सान संयुक्त तंत्रज्ञान आणि कौशल्याद्वारे उपभोक्त्यांना अधिक स्पर्धात्मक वाहने चांगल्या किमतीत उपलब्ध करुन देतील. यामुळे मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या देशांतर्गत कंपन्यांवर त्यांच्या उत्पादनांमध्ये नवनवीन सुधारणा करण्याचा दबाव वाढू शकतो. या दोन कंपन्यांच्या संयुक्तिकरणामुळे भारतीय कार निर्मात्यांना ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचे आव्हान दिले जाऊ शकते. तसेच या विलीनीकरणामुळे भारतातील स्थानिकीकरण आणि पुरवठादार सहकार्याचे मार्गही खुले होऊ शकतात. तथापि, भारतीय कार निर्मात्यांना बाजारपेठेतील वर्चस्व राखण्यासाठी परिस्थितीशी त्वरीत जुळवून घ्यावे लागेल. चिनी कंपन्यांमधील खडतर स्पर्धा आणि जीवाश्म इंधनापासून दूर जाणे यामुळे ऑटोमोबाईल उद्योग सध्या मोठ्या बदलांमधून जात आहे. अशा परिस्थितीमध्ये या दोन मोठ्या कंपन्यांचे एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. होंडा आणि निस्सान या दोन्ही उत्पादकांनी भारतात काही प्रमाणात यशाची चव चाखली आहे. पण हे यश पुढे नेण्यासाठी त्यांना येत्या काळात निश्चितपणे मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.
(अद्वैत फीचर्स)