कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन सेवा सज्जता आणि स्वच्छता मोहिमेवर भर

 

ठाणे : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने १०० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वंकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात आला आहे. या सर्वाची यशस्वी अमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिकेनेही कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यात, नागरी सुविधांच्याबाबतीत कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात यावे. महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे. माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावी. महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात, यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवून त्यावेळी शक्यतो फिल्ड व्हिजिट ठेवू नयेत. नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करावे. तसेच, महापालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अमलबजावणी करावी, असेही या कृती कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले आहे.
कृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे बैठक घेतली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे यांच्यासह पालिकेचे सर्वच अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीबाबतचे सादरीकरण केले. या आढावा बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त राव यांनी राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत विवेचन केले. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचे कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने कृती कार्यक्रम हाती घ्यावा. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे काटेकोर आयोजन आणि यशस्वी अमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले. नागरिकांचे जीवन सुखकर करणे याला प्राधान्य आहे. आपल्या मुलभूत कर्तव्यांचा तो महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावे. प्रशासन सुसंगत पद्धतीने काम करीत असल्याचे नागरिकांना जाणवले पाहिजे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *