हरिभाऊ लाखे
नाशिक –मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या (अजित पवार) प्रमुख नेत्यांना लक्ष्य करणारे माजीमंत्री छगन भुजबळ आणि त्यांना सडेतोड भाषेत प्रत्युत्तर देणारे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांच्यातील कलगीतुरा तूर्तास बंद झाला आहे. पक्षानेच कृषिमंत्री कोकाटे यांना गप्प केले आहे. भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहे. परंतु, पक्षाने भाष्य करण्यास मनाई केल्यामुळे हा विषय आपल्यासाठी संपला, आपण खोलात जाऊ इच्छित नाही, असे ॲड. कोकाटे यांनी स्पष्ट केले.
कोकाटे आणि भुजबळ यांच्यातील राजकीय संबंध कधीच मित्रत्वाचे राहिलेले नाहीत. कोणत्या ना कोणत्या कारणाने कोकाटे हे भुजबळ यांच्यावर टीका, आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून अजित पवार गटाने भुजबळ यांच्या ज्येष्ठत्वापेक्षा कोकाटे आणि झिरवळ यांना मंत्रिमंडळात संधी देणे उचित समजले. त्यामुळे नाराज भुजबळ यांचे पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिक भेटणे झाले. भुजबळ हे उघडपणे पक्षातील प्रमुख नेत्यांवर टीका करत असताना केवळ कोकाटे यांनी त्यांना उत्तर दिले होते. त्यानंतर भुजबळ यांनी कोकाटेंना उपरे म्हणून संबोधले. परंतु, कोकाटे यांनी भुजबळ यांना उत्तर देणे टाळल्याने आश्चर्य व्यक्त होत असताना कोकाटेंनीच त्यामागील कारण सांगितले. हा कलगीतुरा नाही. आपण एक बोललो तर, त्यांनी एक बोलावे. एकसारख्या प्रतिक्रिया व्यक्त करणे पक्षाच्यादृष्टीने हिताचे नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून त्यांच्याकडून निर्णय घेतला जाईल, असे कोकाटे यांनी सूचित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *