अनिल ठाणेकर
ठाणे : आताच्या पिढीने इतका ताण वाढवुन घेतलाय की, हा ताण कसा कमी करायचा, त्या संभ्रमाचाही वेगळा ताण त्यांना उद्भवत आहे. तेव्हा, तणावमुक्त होण्यासाठी श्रीमत् दासबोधांतील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा. असे उदबोधक प्रवचन सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी दिले.
ठाण्यात सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ‘तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ हे तिसरे पुष्प शुक्रवारी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यानी गुंफले. यावेळी, व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष सीए संजीव ब्रम्हे, सुहास जावडेकर तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पूरोहित, विद्याधर वैशंपायन तसेच, सौ.कमल संजय केळकर आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यांनी, ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत. हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा, वृद्ध मंडळीकडून जाणून घ्या. आपल्या परंपरा सोडु नका, त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर, भाग्याशी निगडीत आहेत. एखाद्याचा आदर्श घ्या, पण विनाकारण स्पर्धा करू नका. शेजाऱ्याकडे अमुक आहे, तमुक आहे म्हणुन आपल्याकडे हवे ही असुया नसावी. पाळण्यात होतो, तेव्हा कुठे आजार होते ? शरीर आजारी होत नाही तर, मानसिक अस्वस्थता, ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत. शेवटी अग्नी जर शरीर स्विकारत असेल तर त्या शरीरात आजार नाहीत. असे स्पष्ट करून आज जगण्यातील आत्मा हरवला आहे. जे आपल्या वेदामध्ये, उपनिषदांमध्ये, सनातन ग्रंथामध्ये लिहिले आहे ते सर्वोत्कृष्ठ आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत, हीच खरी संपत्ती आहे. हे सत्य आपल्याला जाणता आले पाहिजे. आपण कितीही शिकलो तरी वेदांपेक्षा उपनिषदांपेक्षा लहान आहोत. वेद हेच आपले गुरु आहेत. त्यामुळेच भारत हा सगळ्यांचा आध्यात्मिक गुरु असुन भगवद्गीता हा आद्यग्रंथ असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वजांचे देणे नाकारले तर, ताण वाढणे स्वाभाविक आहे. तेव्हा, ताण कमी करण्यासाठी श्रीमत् दासबोधामधील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तीचा अवलंब दैनंदिन जीवनात करा. जीवनात प्रवाही राहुन सगळ्या गोष्टी सहज करायला शिका, घरातील देवघरात मुक्तीच्या शक्तीचा धागा आहे, पुढील अनंत पिढयांसाठी तो जपुन ठेवत ह्या मुक्ती त्यांना सोपवा. अशा प्रकारे अध्यात्म आणि ईश्वराशी कृतज्ञ राहण्याचे महत्त्व सोदाहरण विषद करून सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यांनी, गृहस्थधर्मातील कौटुंबिक गमतीजमती सांगत उपस्थित श्रोत्यांना तणावमुक्तीसाठी अनेक सहजसुलभ मार्मिक तोडगे देखील सुचवले.
चौकट
आजकाल सत्य ऐकण्याची कुणाचीच हिंमत नाही. कारण सत्य कटू असते, ते सत्य नारायण आहे. तेव्हा, रस्त्यावर असेल अथवा कुठेही सत्यनारायणाच्या दर्शनाचा संकोच करू नका. किंबहुना, वर्षभरात प्रत्येकाच्या घरात एक तरी सत्यनारायण झाला पाहीजे. घरातील हॉलमध्ये सत्यनारायण आणि महाप्रसाद टेरेसवर असे प्रघात टाळा. असे स्पष्ट करून श्री वेणाभारती यांनी केळीच्या पानावरील शिऱ्याच्या प्रसादाची महती विषद केली.
