अनिल ठाणेकर
ठाणे : ११ व १२ जानेवारीला राजकोट जिल्ह्यातील उपलेटा शहरात कॉम्रेड सीताराम येचुरी नगर येथे सीपीआय(एम) चे २४वे गुजरात राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनात १० जिल्ह्यांतील १९२ प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापैकी ५६ महिला प्रतिनिधी होत्या. तसेच तरुणांचाही मोठा सहभाग होता.
अधिवेशनाची सुरुवात मगनभाई जिवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. शहीदांना पुष्पांजली अर्पण करून शोक प्रस्ताव घेण्यात आला. यांनतर उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद माजी राज्य सचिव प्रागजीभाई भांभी यांनी भूषवले. स्वागत समितीच्या अध्यक्षा किरणबेन कालावाडिया यांनी सर्वांचे स्वागत केले. अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. अशोक ढवळे यांनी केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात साम्राज्यवाद व झायोनिझमचा आणि राष्ट्रीय क्षेत्रात नव-फॅसिस्ट आरएसएस-भाजपचा धोका स्पष्ट केला. यावेळी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींच्या एकतेची गरज त्यांनी अधोरेखित केली तसेच सीपीआय(एम) ची स्वतंत्र ताकद आणि प्रभाव वेगाने वाढवण्याची निकड देखील विषद केली.अधिवेशनात अहवाल दोन भाग्गत सादर करण्यात आला आणि दोन भागात त्यावर चर्चा झाली. राज्य सचिव एच.आय.भट्ट यांनी राजकीय भाग मांडला आणि केंद्रीय समिती सदस्य अरुण मेहता यांनी संघटनात्मक भाग मांडला. पहिल्या भागावर २४ प्रतिनिधींची भाषणे झाली आणि दुसऱ्या भागावर १७ प्रतिनिधींची भाषणे झाली. अहवाल एकमताने मंजूर झाला, तसेच प्रमुख मुद्द्यांवर १२ ठरावही करण्यात आले. पहिल्या दिवशी उपलेटा टाऊन हॉलमध्ये “शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. डॉ. अशोक ढवळे, मुरलीधरन आणि दयाभाई गजेरा यांची भाषणे झाली. अधिवेशनात माजी राज्य सचिव सुबोध मेहता यांनी लिहिलेल्या “कम्युनिस्ट विचारसरणी” या गुजराती पुस्तिकेची नवीन आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. उदय जोशी यांनी क्रेडेन्शियल अहवाल सादर केला. या अधिवेशनाने एकमताने ३० सदस्यांची नवीन राज्य समिती आणि कायमस्वरूपी निमंत्रितांची एकमताने निवड केली. नवीन राज्य समितीने एकमताने एच. आय. भट्ट यांची राज्य सचिवपदी फेरनिवड केली आणि ९ सदस्यांचे राज्य सचिवमंडळ निवडले. मदुराई पक्ष काँग्रेससाठी ६ प्रतिनिधी, २ पर्यायी प्रतिनिधी आणि २ निरीक्षकांची निवड केली. मुरलीधरन यांनी समारोपाचे भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी संघटनेशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर भर दिला. उपलेटा तहसील आणि राजकोट जिल्हा संचाने परिषदेसाठी उत्कृष्ट व्यवस्था केली होती. आयोजक आणि स्वयंसेवकांचे आभार मानल्यानंतर, मोठ्या उत्साहात अधिवेशनाची सांगता झाली.
