नवी मुंबई : सखोल स्वच्छतेव्दारे हवा गुणवत्ता सुधारणेवर भर देत 30 डिसेंबरपासून 13 जानेवारी पर्यंत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सुट्टयांसह सलग 15 दिवस सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. त्यामुळे हवा गुणवत्तेत सुधारणा झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली राबविल्या जात असलेल्या या स्वच्छता मोहीमांमध्ये प्राधान्याने रस्ते, पदपथ, दुभाजक यांच्या कडेला जमा झालेली माती गोळा करुन त्याठिकाणी प्रक्रियाकृत पाण्याने स्वच्छता करण्यावर भर देण्यात आला. ही मोहीम अशीच पुढे चालू ठेवत कोपरखैरणे विभाग कार्यालय हद्दीत सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून 16 जानेवारी रोजी सेक्टर 2 मुख्य रस्ता तसेच 17 जानेवारी रोजी समतानगर व खैरणे गाव व गावठाण मुख्य रस्ता या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे से.11 कोपरखैरणे येथील मुख्य रस्त्यावरील दुभाजक पाण्याने साफ करुन रंगावरील धूळ धुवून घेण्यात आली. अशाच प्रकारच्या सखोल स्वच्छता मोहीमा सर्वच विभागांमध्ये राबविण्यात येत आहेत.
