ट्रॅकनाईट ॲथलेटिक्स स्पर्धा
मुंबई: एआयएम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या युग पाटीलने युनिव्हर्सिटी पॅव्हेलियन मैदानावर खेळल्या गेलेल्या ट्रॅकनाईट ॲथलेटिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीत तीन सुवर्णपदक जिंकून 12 वर्षांखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान मिळविला.
60 मीटर धावणे प्रकारात अत्यंत चुरस पाहायला मिळाली. युग पाटीलने 8.465 सेकंद वेळेसह रेस पूर्ण करताना वर्चस्व गाजवले. त्याला डीएसएसएच्या दैविक नायडूकडून (8.620 सेकंद) चांगला प्रतिकार लाभला. त्याने रौप्यपदक मिळवले. चिल्ड्रन्स ॲकॅडमी ग्रुप ऑफ स्कूलच्या (अशोक नगर) जेसन जिमीने ९.०१५ सेकंद वेळेसह तिसरे स्थान मिळवले.
त्यापूर्वी, युग पाटीलने 120 मीटर धावणे प्रकारात सातत्य राखताना उल्लेखनीय वेगाचे प्रात्यक्षिक करून 15.862 सेकंदात अंतिम रेषा पार केली. या प्रकारातही दैविक नायडूने 16.973 सेकंदाच्या वेळेसह दुसरे स्थान पटकावत पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले. जीएईटीमधील आरव कुलकर्णीने 17.740 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.
300 मीटर धावण्याच्या प्रकारात युग पाटीलने 42.779 सेकंदांच्या उल्लेखनीय वेळेसह सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तसेच दिवसातील निर्विवाद स्प्रिंट किंग म्हणून स्वत: ला सिद्ध केले. यश पालवीने 47.006 सेकंदात रेस पूर्ण करताना रौप्यपदक मिळवले. जीएईटीमधील श्री कांबळीचे (47.027 सेकंद) दूसरे स्थान थोडक्यात हुकले.