कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात नाताळ साजरा
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पूर्व विभागातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात नाताळ सणानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २५ डिसेंबर हा दिवस भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस तसेच भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी स्वातंत्र्यसैनिक व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांचा जन्मदिन असल्याने उपस्थितांनी तिन्ही थोर व्यक्तिमत्त्वांना सामूहिकरीत्या आदरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमात शंभरपेक्षा अधिक नागरिक व व्यायामप्रेमी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी व्यायाम समितीचे सदस्य सोमार्डे यांनी भगवान येशू ख्रिस्त, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच पंडित मदन मोहन मालवीय यांच्या कार्याची माहिती देवून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक व खासदार कार्यालयाचे प्रकाश माने यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या, आनंदी व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.
