तो आला.. गायला अन् त्याने नाचायला लावलं
ठाणे : तो आला…गायला अन् त्याने सर्वांना आपल्या गाण्यांनी सर्वांनाच नाचायला लावले. चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित २० व्या कोळी महोत्सवात कोळी गीतांचे बादशहा श्रीकांत नारायण यांनी सर्व उपस्थितांना हा अनुभव घ्यायला लावला.
चेंदणी बंदरावर रंगलेल्या या कोळी महोत्सवात श्रीकांत नारायण यांनी मी हाय कोली, डोल डोलतय वाऱ्यावरी, वेसावची पारु गात सगळ्यांना ताल धराला लावला. प्रारंभी जेष्ठ पत्रकार आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी निवड समिती सदस्य प्रल्हाद आणि सुमती नाखवा, शुभदा आणि जयंत कोळी या दांपत्यांनी दीप प्रज्वलन करुन कोळी महोत्सवाचे रितसर उद्घाटन केले. मनोगत व्यक्त करताना प्रल्हाद नाखवा म्हणाले, मंचाचा संस्थापक सदस्य म्हणून या सांस्कृतिक उपक्रमाचा अभिमान वाटतो. असू आम्ही नसू आम्ही पण कोळी महोत्सवाचा वारसा कायम ठेवा तुम्ही. यावेळी ख्यातनाम दिवंगत संगीतकार आर.डी.बर्मन यांचे सहकारी भरत आशार, हरेश्र्वर मोरेकर, माजी सभागृह नेते कृष्णकुमार कोळी, भगवान कोळी, प्रकाश ठाणेकर, जर्मनीच्या होल्मास शहराच्या टाऊन प्रेसिडेंट वर्षा रूटझ त्यांचे पती फ्रँक रूटझ आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाचे औचित्य साधून जेष्ठ योग प्रशिक्षक दांपत्य मिनाक्षी आणि रमेश कोळी, जेष्ठ खो खो पंच आणि भजन गायिका चंद्रप्रभा तांडेल, आंतरराष्ट्रीय ढोलकी वादक,सर्जन डॉ श्रेयल कोळी, यंदाच्या शालांत परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारी सान्वी ठाणेकर, महाराष्ट्राची सौंदर्यवती – ग्लोविंग स्किन पुरस्कार विजेती युगंधरा दर्शन कोळी, दीर्घ पल्ल्याची सागरी जलतरणपटू धृती कोळी, २६ अखिल पोलिस बँड वादन स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देणारा संदिप गारगोटे, यू ट्यूब वरील साक्षात स्वामी समर्थ मालिकेचे दिग्दर्शक स्वप्नील कोळी यांना गौरवण्यात आले. लाावणी सम्राडी प्रद्न्या कोळी – भगत हिच्या लावणी नृत्यासह सहा पथकांनी नृत्ये सादर केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनाली ठाणेकर, प्रमोद कोळी, नागेश कोळी, गिरीश कोळी यांनी केले.
