Heading – सेना भाजपाच्या युतीमुळे मनसेतून पक्षांतर केलेल्यांचे पुन्हा मनसे प्रवेशासाठी प्रयत्न
पक्षांतर केलेल्यांसाठी मनसेचे दारं बंद – राजू पाटील
कल्याण : कल्याण डोबिवली महानगरपालिका निवणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली असून त्याबाबतचे जागावाटप देखील निश्चीत झाले आहे. आज संध्याकाळ पासून उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरवात करणार असल्याची माहिती मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी दिली.
सर्व जागांवर आमचे उमेदवार फायनल झाले असून जागावाटप निश्चित झालं आहे. सेना भाजपाची युती शब्दशः झाली आहे मात्र मनातून तुटली आहे. दोन दिवसांत बघा काय काय होतं. आमच्यातले जे पैसे घेऊन दुसऱ्या पक्षात गेले आहेत त्यांचे आता फोन येत आहेत आम्हाला परत घ्या, परंतु त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायमचे बंद केले असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.
जैन मुनींनी त्यांचं काम करावं राजकिय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊ नये. साधुसंत पवित्र काम करत असतात, त्यांनी राजकारणात पडू नये. शिवसेना भाजपा वाल्यांनी निवडणुकी अगोदरच चढाओढीने आयात केलेले काही लोकं आहेत. पैसे देऊन केले असतील किंवा काही लोकांना भीती दाखवून केले असेल त्यांचा उद्रेक होणार. तर केडीएमसीच्या 122 जागांपैकी 54 ते 55 जागा मनसेसाठी राखीव ठेवल्या आहेत इतर जागांमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी आपले उमेदवार देणार आहेत.
केडीएमसी निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा कल्याण डोंबिवलीत होणार असून 122 पैकी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊन आमचा महापौर बसेल असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला.
