मुंबई: डी. बाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीने भारत क्रिकेट क्लबचा ८७ धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ६ व्या अर्जुन मढवी स्मृती महिला टी – २०! क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.अंतिम फेरीत त्यांचा सामना फोर्ट यंगस्टार्स क्रिकेट क्लबवर ४९ धावांनी विजय मिळवणाऱ्या दिलीप वेंगसरकर फाउंडेशन संघाशी होईल. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीच्या ५ बाद १८७ धावांचा पाठलाग करताना भारत क्रिकेट क्लब संघाला निर्धारित षटकांमध्ये ८ बाद १०० धावा करता आल्या.तर अन्य लढतीत २ बाद १९७ धावांच्या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या फोर्ट यंगस्टार्स क्रिकेट क्लबला दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या गोलंदाजानी ६ बाद १४८ धावांवर रोखत विजय मिळवला.
उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत सानिका चाळकेचे अर्धशतक आणि हुमरा काझी, सेजल राऊतच्या महत्वपूर्ण योगदानामुळे डी. वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीने ५ बाद १८७ धावा केल्या. सानिकाने ५६, हुमराने ३१ आणि सेजलने ४१धावांची भर टाकली. या डावात प्रणाली कदम, कशीश निर्मोल, निर्मिती राणे, परिणीता पाटील आणि राजसी नागोसे यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. उत्तरादाखल आंचल वाळुंजने २३, परिणीताने १९ आणि राजसीच्या १६ धावांमुळे भारत संघाला धावांचे शतक पाहता आले. प्रकाशिका नाईकने तीन आणि अक्षया शिंदेने दोन फलंदाज बाद केले.
दुसऱ्या लढतीत फातिमा जाफरने नाबाद ८५ धावांची खेळी करत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मंजिरी गावडेने ५५ आणि सिमरन शेखने नाबाद ३९ धावा केल्या. झील डिमेलो आणि जाग्रवी पवारने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. त्यानंतर रिया चौधरी, मानसी पाटील आणि जाग्रवी पवारने किल्ला लढवता ठेवला. रियाने ३२, मानसीने ३९, जाग्रवीने ३० धावा बनवल्या. रेश्मा नायक आणि रिद्धी ठक्करने प्रत्येकी दोन बळी टिपले.
