कुस्तीपटू कोमल पटेलला रौप्य पदक
ठाणे : वसंतदादा कुस्ती केंद्र यशवंत नगर सांगली या ठिकाणी संपन्न झालेल्या २० वर्षा खालील राज्यस्तरिय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील कुस्तीपटू कोमल पटेलने रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध वजनी गटातून निवड झालेल्या पैलवानांचा समावेश होता. ५० किलो वजनी गटात कोमलने पहिल्या फेरीत पुणे शहर जिल्ह्याच्या पूर्वा परदेशीला १० तांत्रिक गुणांच्या फरकाने सहज नमवले. दुसऱ्या फेरीत कोमलने जळगावची कसलेली मल्ल समीक्षा काळेला चितपट केले. या कुस्तीत कोमलने क्षणाचा ही विलंब न लावता झोळी या डावाची पकड घेत समिक्षाला चितपट करत सर्वांना अचंबित केले. तिसऱ्या फेरीत देखील तिने मुंबई उपनगराच्या रसिका माळीला चितपट करत अंतिम फेरीत मजल मारली. निर्णायक सामन्यात कोमलची लढत अनुभवी, अनेक पदके जिंकलेल्या कोल्हापूरच्या गौरी पाटीलशी होती, पण अखेर अनुभवाने वरचढ असलेल्या गौरीने कोमलला तांत्रिक गुणांच्या जोरावर नमवुन सुवर्ण पदक मिळवले. तर कोमलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कोमल ही सध्या अभिनव कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या कॉलेज मध्ये कला शाखेच्या प्रथम वर्षात शिकत आहे . राज्यस्तरावरील कुस्ती स्पर्धेत कोमलचे हे पहिलेच पदक होते. श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा वसंतराव पाटील , वैभव माने यांचे मोलाचे मार्गदर्शन कोमलला मिळत आहे.
