काल २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मसमर्पण दिवस साजरा झाला, तर आज २७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठविजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. आजचा दिवस महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो, तर आजपासून १० मार्च पर्यंत म्हणजेच कुसुमाग्रजांच्या पुण्यतिथीपर्यंत महाराष्ट्रात मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातो. शासकीय आणि सार्वजनिक स्तरावर त्याची जोरदार तयारी सुरू आहे.
मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, हा पंधरवाडाभर आपण मराठीचे कौतुक केले की वर्षभर आपण मराठीला विसरलेलेच असतो, त्याचे काय? आपण मराठी माणसं मराठी कडे कितपत लक्ष देतो आणि किती दुर्लक्ष करतो याचाही कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे. मराठी माणसाने जर मनापासून ठरवले तरच मराठीला योग्य तो सन्मान मिळू शकेल.
आज आम्ही मराठीला अभिजात दर्जा मिळाला, पण केंद्र सरकार निधी देत नाही याबद्दल कुरकुर करतो. मात्र आम्ही मराठीसाठी काय करतो याचा कोणी तरी विचार करतो काय? अगदी आपल्या घरचेच उदाहरण घ्या, लहान मुल बोलायला लागले की पूर्वी आम्ही त्याला आई-बाबा म्हणायला शिकवायचे. आज अगदी तळागाळातल्या कुटुंबांमध्ये सुद्धा मम्मी पप्पा किंवा मग मम्मा डॅडा म्हणायला शिकवले जाते. आमच्या शेजारीच एका दोन वर्षाच्या बालिकेला मायबापांनी कौतुकाने मम्मा म्हणायला शिकवले. मात्र ती बालिका कदाचित भारतीय संस्कृतीवर मनापासून प्रेम करणारी असावी. त्यामुळे ती आईला मम्मा न म्हणता अम्माच म्हणू लागलेली आहे. तिथे त्या मायबापांचा नाईलाज झालेला आहे.
पूर्वी मुलांना शाळेत घातले की पाटीवर मराठी मुळाक्षरे गिरवायला शिकवले जायचे. आज-काल प्रत्येक कुटुंबात मुलांना एबीसीडी शिकवले जाते. पूर्वी चिऊ काऊ ची गाणी शिकवली जायची. आता ट्विंकल स्टार शिकवले जाते. आई वडील त्या मुलांशी इंग्रजीतच बोलतात. इतकेच काय पण घरी पाळलेल्या कुत्र्याशी माफ करा डॉगीशी देखील इंग्रजीतच बोलले जाते. त्यालाही इंग्रजीच शिकवली जाते.
आज मराठी शाळा बंद पडत आहेत म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात ओरड करतो आहोत. मात्र आम्हीच आमच्या मुलांना जागतिक स्पर्धेत टिकायला हवे म्हणून बालवाडीत न पाठवता के जी वन के जी टू मध्ये पाठवतो आणि तेव्हापासूनच त्यांच्यावर आंग्ल संस्कार करत असतो. आमच्या लहानपणी आम्ही मराठी गोष्टीचे पुस्तके वाचूनच आमची वाचन संस्कृती जपली. त्या काळात मराठी चांदोबा, फुलबाग, कुमार, मुलांचे मासिक अशी सकस मराठी शिकवणारी आणि मुलांचे सामान्य ज्ञान वाढवत मनोरंजन करणारी अनेक नियतकालिके उपलब्ध होती. त्याशिवाय इंद्रजाल कॉमिक्स सारखी कॉमिक्स देखील मुलांसाठी मराठीत उपलब्ध होती. श्यामची आई, फास्टर फेणे यांच्यासारखी मराठी पुस्तके देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. मात्र आज मुलांना वाचायला हॅरी पॉटर दिला जातो. माझ्यासारखा एखादा बाप मुलीसाठी कौतुकाने श्यामची आई सारखे पुस्तक घेऊन येतो. मात्र ते कधीच वाचले जात नाही. ही बहुतेक सर्व मराठी कुटुंबांमधील शोकांतिका आहे. माझी आतापर्यंत १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मध्यंतरी माझ्या मुलीला तिच्या एका मैत्रिणीने विचारले की तू तुझ्या बाबांची किती पुस्तके वाचली आहेत? तेव्हा तिने एकही नाही असे उत्तर दिले होते. बहुतेक सर्व मान्यवर मराठी लेखकांच्या घरी असेच ऐकायला मिळते.
मुलांचे जाऊ द्या, पण आज आम्ही तरी सामाजिक जीवनात शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो का? याचे उत्तर नकारार्थीच मिळते. आज मराठीत सर्वांना समजतील असे शब्द वाक्प्रचार म्हणी या सगळ्याच उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना चपखल असे मराठी शब्द रूढ केलेले आहेत. मात्र त्याचा उपयोग आम्ही फार कमी करतो. सकाळी उठल्यावर कोणालाही गुड मॉर्निंग म्हणण्यात आम्हाला भूषण वाटते. त्याऐवजी आम्ही सुप्रभात का म्हणत नाही हा देखील मला कायम प्रश्न पडत असतो.
मराठी पुस्तके तरी किती वाचतो याचा शोध घेतल्यास आपल्या पदरी निराशाच पडेल. पूर्वी मराठी ललित पुस्तके हातोहात विकली जात असत. मला आठवते, माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा प्रकाशकाने पहिली आवृत्ती हजार प्रतींची काढली होती. ती संपली आणि दुसरी आवृत्ती देखील काढावी लागली होती. नंतर पुस्तके विकली जात नाहीत म्हणून प्रकाशकांनी हजार वरून पाचशेवर आकडा आणला. आता तर ३००-४०० च्या वर आवृत्ती निघत नाही, अशी मराठी साहित्याची शोकांतिका आहे. पूर्वी ढिगाने मराठी नियतकालिके प्रकाशित व्हायची. माझ्या लहानपणी आमच्या घरी सर्क्युलेटिंग लायब्ररी, माफ करा फिरते वाचनालय लावले होते. तो दर चार दिवसांनी वेगवेगळी मराठी मासिके घरी आणून देत असे. त्यात स्त्री किर्लोस्कर प्रपंच ललना वाङ्मय शोभा मनोहर अशी कितीतरी नियतकालिके घरी यायची. ती वाचूनच आमची मराठी समृद्ध झाली होती. आज अशी किती नियतकालिके निघतात हे शोधावे लागेल. निघत असतीलही, पण ती वाचली जातात का? कारण आता ऑनलाईनचा जमाना आला आहे.
मराठीसाठी आज राजकीय नेते भांडतात. मुंबईत म्हणे परप्रांतीयांना मराठीत बोला म्हणून आग्रह धरला जातो. त्यासाठी हाणामारी केली जाते. मात्र हाणामारी करणाऱ्यांचीच मुले कॉन्व्हेंट मध्ये शिकतात आणि मग मुंबईतल्या मराठी शाळा बंद पडतात म्हणून आम्हीच ओरड करतो. मराठीच्या संवर्धनासाठी सरकारने काहीतरी केले पाहिजे, केंद्राने निधी दिला पाहिजे, म्हणून आम्ही कंठशोष करतो, मात्र आम्ही चांगले काय मराठी वाचले हे विचारले तर आजची चार चांगली पुस्तके देखील सांगू शकत नाहीत. मराठी साहित्यिकांना सन्मान मिळावा यासाठी आम्ही काहीही करत नाही. त्यामुळेच मराठीची अवस्था दयनीय आहे. कुसुमाग्रजांनी मराठी मंत्रालयाच्या दारासमोर लक्तरे पांघरून उभी आहे अशा आशयाची एक कविता केली होती. आज मराठीची तीच अवस्था आहे, आणि त्यासाठी सर्वात पहिले मराठी माणूस जबाबदार आहे.
म्हणूनच आता प्रत्येक मराठी माणसाने “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे लक्षात ठेवून कटाक्षाने मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करावा. मराठीत वाचण्याचा मराठी लिहिण्याचा चांगले मराठी चित्रपट चांगली मराठी नाटके बघून त्यांना उत्तेजन देण्याचा चांगल्या मराठी दूरदर्शन मालिका बघून त्यांचा टीआरपी माफ करा प्रेक्षक संख्या वाढवण्याचा संकल्प करायला हवा, आणि हो फक्त संकल्प करू नका तर तो अमलात देखील आणायचा अगदी पूर्ण ताकदीने प्रयत्न करायला हवा. एकूणच मराठीचा सन्मान वाढवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानेच पुढे यायला हवे. प्रत्येक मराठी माणसाने जर मराठीचा अभिमान बाळगला आणि मराठीचा प्रचार प्रसार केला, तर मराठी फक्त भारतातीलच अभिजात भाषा म्हणून ओळखली जाणार नाही, तर जागतिक स्तरावर देखील मराठीला सन्मान मिळू शकेल, इतकंच सहज सुचलं म्हणून सांगावसं वाटतं.

अविनाश पाठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *