७२वी वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा, बडोदरा, गुजरात – २०२६.
महाराष्ट्राचा पुरुष संघ अंतिम फेरीत.
वडोदरा : महाराष्ट्राने “७२व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत महाराष्ट्राची गाठ चंदीगड व भारतीय रेल्वे यांच्यातील विजयी संघाशी होईल. गुजरात, वडोदरा येथील सागा बंदिस्त क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्रने उत्तर प्रदेश संघाचे कडवे आव्हान ४९-३६ असे परतवून लावले. चरखी, दादरा, हरियाणा येथे जुलै २०२२ साली झालेल्या ६८व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ही किमया साधली होती. महाराष्ट्राने झोकात सुरुवात करीत उत्तर प्रदेश वर लोण देत १२-०७ अशी आघाडी घेतली. विश्रांतीला २८-२२ अशी आघाडी राखत आपला इरादा स्पष्ट केला. विश्रांती नंतरच्या खेळात आपल्या हातून ही आघाडी निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. शेवटची ३ मिनिटे पुकारली तेव्हा ४४-३४ अशी महाराष्ट्र कडे आघाडी होती. महाराष्ट्राचा या सामन्यात बचाव भक्कम झाला. असलम इनामदार, आदित्य शिंदे, शुभम पाठरे यांच्या संयमी चढायांना संकेत सावंत, जयेश महाजन यांची मिळालेली पकडीची उत्तम साथ यामुळे हा विजय मिळविता आला.
या अगोदर रात्री उशीरा झालेल्या उपांत्यापूर्व सामन्यात महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशला ५३-३८ असे पराभूत केले. आदित्य शिंदे,अजित चौहान यांच्या झंझावाती चढायांना दादासो पुजारी, संकेत सावंत, जयेश महाजन यांची मिळालेली बचावाची साथ यामुळे हा विजय शक्य झाला.
