Month: February 2026

क्रिकेट गुणलेखक बळवंत सकपाळ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

क्रिकेट गुणलेखक बळवंत सकपाळ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ठाणे:  फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ क्रिकेट गुणलेखक आणि कचराळी तलाव मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे संस्थापक बळवंत विठ्ठल सकपाळ यांना नुकतेच जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रास्ताविकात आनंद टंगसाळी म्हणाले, बळवंत सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आमचा ग्रुप दरवर्षी उरळीकांचन, कुशावर्त प्रदक्षिणा करायचा. तर चार वर्षातून एकदा होणारी आमची हिमालय भ्रमंती आजही सुरु आहे. फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे हरेश्र्वर मोरेकर म्हणाले, क्लबच्या वार्षिक मैत्री दिन साजरा करताना बळवंत सकपाळ यांचा उत्साह, आयोजन, नियोजन आदर्शवत होते. ते भविष्याचा वेध घेणारे  इष्टे होते.  कचराळी तलावाभोवती वॉक करण्याच्या आठवणींना आनंद शेणोलीकर यांनी उजाळा दिला. तर आपल्या सर्वांगीण प्रगतीत  बाबा माझे हिरो होते अशी भावना सकपाळ यांची ज्येष्ठ कन्या अश्विनी कदम यांनी व्यक्त केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बळवंत सकपाळ सत्काराला उत्तर देऊ शकले नाहीत.यावेळी संजीवनी सकपाळ, भारती मोरेकर, निलम सकपाळ, हॉटेल शेल्टरचे शर्माजी, अनिरुद लिमये आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद नाखवा यांनी केले. सकपाळ यांचे चिरंजीव आलोक यांनी “ देणारे दुर्मिळ घेणारे पुष्कळ, तरी जपतात बाबा बळवंत, आनंद द्या आनंद घ्या चा वारसा, खरच हा मुलखावेगळा वसा, आपणा सर्वासाठी ठरावा आरसा, या चारोळीने कार्यक्रमाची सांगता केली.

श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिननिमित्त `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिननिमित्त `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणे -भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या नामांकित संस्थेचा २५ वा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात…

 वोकहार्ट हॉस्पिटल आणि काशीमीरा ट्रॅफिक पोलिसांचा रस्ते सुरक्षा अभियान

वोकहार्ट हॉस्पिटल आणि काशीमीरा ट्रॅफिक पोलिसांचा रस्ते सुरक्षा अभियान रस्ते सुरक्षा महिन्यानिमित्त सीएसआर उपक्रमांतर्गत दुचाकी चालकांना २५० हेल्मेटचे वाटप मिरा -भाईंदर : वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड आणि काशीमीरा ट्रॅफिक पोलिसांच्या…

विल्सन कॉलेज जिमखाना कॉलेजकडे परत द्या

विल्सन कॉलेज जिमखाना कॉलेजकडे परत द्या राज्यभरातील आंदोलनकर्ते आझाद मैदानात रमेश औताडे मुंबई : “एक मागणी – एक आक्रोश” या घोषवाक्याखाली सोमवारी आझाद मैदान, सीएसटी, मुंबई येथील विल्सन कॉलेज जिमखाना परत विल्सन कॉलेजकडे देण्याच्या मागणीसाठी राज्यस्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आले. डॉ.लालबहादूर कांबळे-सेक्रेटरी जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली आणि  महाराष्ट्रातील सहा धर्मप्रांत (सीएनआय) , विल्सन कॉलेज ॲल्युमनी असोसिएशन, आम्ही गिरगावकर आणि रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई धर्म प्रांताचे बिशप रा.रेव्ह. जेबामणी, रा.रेव्ह.कसाब-नाशिकचे बिशप, रा.रेव्ह.पाटोळे- मराठवाड्याचे बिशप, रा.रेव्ह.काटे- कोल्हापूरचे बिशप, रा.रेव्ह.परमज्योती- मॉडरेटर प्रतिनिधी नागपूर डायोसीज, रेव्ह.चोपडे आणि ॲड.सिरील दारा यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. विल्सन कॉलेजच्या ताब्यात गेली ११५ वर्षे असलेला जिमखाना कथितरीत्या बेकायदेशीरपणे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (JIO) कडे देण्यात आल्याचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. जिमखाना हा विद्यार्थ्यांसाठी, क्रीडापटूंकरिता आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक क्रीडा केंद्र असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा

इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा रमेश औताडे मुंबई : सार्वजनिक परिवहन सेवा वापर करा व इंधन वाचवा असे आवाहन करत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हरित ऊर्जा वापरण्याचे व पर्यावरण रक्षण करण्याचे आवाहन सक्षम २०२५ – २६ (  संरक्षण क्षमता महोत्सव ) या देशातील ऑइल  कंपन्याच्या जनजागृती कार्यक्रमात रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे केले. या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे, परकीय तिजोरीवरील बाडता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने समर्थनाने जनजागृती पसरविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतात. सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) २०२५-२६ हे १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी  दरम्यान आयोजित केले जातील, संपूर्ण देशभर ज्याची टॅगलाइन “कन्सर्व ऑइल अँड गॅस, गो ग्रीन” अशी असेल. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी  पर्यंत तेल विपणन कंपन्या (ओएमसी) राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे असे महाराष्ट्र कार्यक्रम समन्वयक दिपक वाघ यांनी सांगितले. उमेश विलास कुलकर्णी, राज्यस्तरीय समन्वयक (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू), महाराष्ट्र, थॉमस जेम्स, प्रमुख रिटेल (पश्चिम), बीपीसीएल, मिहिर जोशी, राज्य प्रमुख (रिटेल), एमएच-१ आणि गोवा, बीपीसीएल, वरुण कुमार, उपमहाव्यवस्थापक ऑपरेशन्स पश्चिम विभाग, एचपीसीएल,  देवांशु मिश्रा महाव्यवस्थापक ल्युब्स, आयओसीएल,  जितेंद्र गुप्ता, महाव्यवस्थापक (विपणन), गेल इंडिया लिमिटेड यांचा समावेश होता.

 राज्यातील रोजगार हमी योजनेतील कामगारांचे आंदोलन

राज्यातील रोजगार हमी योजनेतील कामगारांचे आंदोलन रमेश औताडे मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वेतन व सेवाशर्तींबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरवठा करताना नियमांचे पालन होत नसून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कर्मचारी अन्याय सहन करत तक्रारी आहेत. त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा व समान कामासाठी समान वेतन या तत्वांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. काही विभागांमध्ये एका खासगी कंपनीमार्फत मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ पुरवठा केला जात असून, या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप आहे. कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांमध्ये प्रत्यक्षात खासगी मध्यस्थांचा सहभाग वाढल्याने रोजगार हमीचा मूळ उद्देश बाजूला पडत असल्याची टीका होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ सेवा बजावूनही कायमस्वरूपी दर्जा, वेतनवाढ किंवा मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर आऊटसोर्सिंग पद्धतीचा सखोल आढावा घेऊन स्पष्ट धोरण आखावे, कर्मचाऱ्यांचे हक्क निश्चित करावेत आणि नियमबाह्य नियुक्त्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा या व्यवस्थेमुळे शोषण वाढून प्रशासकीय यंत्रणेत असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 समाज विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावेत

समाज विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावेत खासदार नरेश म्हस्के यांचे आयुक्तांना निर्देश ठाणे -ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी समाज विकास विभागाच्यावतीने समाजातील गरजू महिला तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या…

मुंबई पोर्टच्या जागेवर गोदी कामगारांना घरे मिळालीच पाहिजे- ॲड. एस. के. शेट्ये

मुंबई पोर्टच्या जागेवर गोदी कामगारांना घरे मिळालीच पाहिजे- ॲड. एस. के. शेट्ये अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई पोर्टच्या जागेवर अनधिकृतपणे  राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घरे देण्याचा विचार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात, परंतु ज्या बंदर व गोदी कामगारांनी मुंबई पोर्टच्या विकासासाठी परिश्रम करून बंदराचा नावलौकिक केला, त्या गोदी कामगारांना मुंबई पोर्टच्या जागेवर घरे मिळालीच पाहिजे, असे स्पष्ट उद्गार ज्येष्ठ कामगार नेते  ॲड. एस.के.शेट्ये  यांनी काढले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. मुंबई पोर्ट प्राधिकरण आउटडोअर डॉक्स स्टॉफ श्री सत्यनारायण महापूजा समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी  दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात गोदी विभागातील  कामगार कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. करमणुकीचा कार्यक्रम म्हणून ‘कुटुंब किर्रतन’  हे नाटक दाखविण्यात आले. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस श्री.सुधाकर अपराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गोदी कामगारांनी कमी कामगार संख्येत काम करून मुंबई बंदराची प्रगती केली आहे. मात्र अद्यापही बोनसचा समझोता करार होऊन देखील अंतिम करारावर सह्या झाल्या नाहीत. स्टॅगनेट झालेल्या कामगारांचा प्रश्नही प्रलंबित आहे. तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बढती मिळून जे अधिकारी झाले, त्यांना पगारवाढीत न्याय मिळावा. या व इतर उद्योगधंद्यातील कामगारांच्या मागण्यांसाठी भारतातील केंद्रीय कामगार संघटना १२ फेब्रुवारीला भारत बंद करणार आहेत, त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन केले.  या कौटुंबिक  सोहळ्यात नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी मारुती  विश्वासराव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा  ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर,  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बापू घाडीगावकर,  पूजा समितीचे अध्यक्ष संदीप घागरे, मुंबई पोर्ट  ट्रस्ट एस.एसटी. आणि ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस अंकुश कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर  उपस्थित होते. कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे सुंदर निवेदन पूजा समितीचे सल्लागार विजय सोमा सावंत यांनी केले. कौटुंबिक स्नेहसंमेलनासाठी आलेल्या गोदी कामगारांच्या कुटुंबीयांनी नाट्यगृह तुडुंब भरले होते.

‘नाशिक महापालिका सत्तेत आम्हाला कुबड्या नको’

‘नाशिक महापालिका सत्तेत आम्हाला कुबड्या नको’ हरिभाऊ लाखे नाशिक: मनपाच्या सत्तेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या उतावीळपणाला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी ब्रेक लावला आहे. महायुती म्हणून निवडणूक लढलो तेथे घटक पक्षांना सत्तेत सहभागी करून घेतले. नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली असून, ७२ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे सत्तेत कोणाच्याही कुबड्यांची गरज नसल्याचे सांगत, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभाग देण्यास त्यांनी नकार दिला आहे. नाशिक येथे रविवारी भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांशी महाजन यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिकच्या महापौर तसेच सत्तास्थापनेबाबत भूमिका मांडली. आम्ही स्वबळावर ७२ जागा निवडून आणल्या. विरोधकांचे पाच ते सहा नगरसेवक संपर्कात आहेत. आम्ही बहुमतात असल्याने कोणाच्याही कुबड्यांची आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करण्याचा कोणताही प्रस्ताव मित्रपक्षांना दिला नसल्याचे सांगत, महाजन यांनी केदार यांच्या दाव्याची हवा काढून घेतली. जळगावमध्ये महायुती म्हणून लढल्याने या ठिकाणी शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेणार आहोत. त्यामुळे शिंदेसेनेला विरोधी बाकावर बसावे लागण्याची शक्यता आहे. इच्छुकांचे लॉबिंग सुरू मंत्री महाजन हे भाजप कार्यालयात आले असता महापौरपदासह स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी त्यांच्याकडे लॉबिंग केले. महापौरपद सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने इच्छुक महिलांची गर्दी झाली होती. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्यांनी भाऊ, आम्हाला स्वीकृतसाठी तरी संधी द्या, अशी गळ महाजन यांना घातली. वरिष्ठांच्या चर्चेनंतर महापौरांची घोषणा महापौरपदी कोणास संधी द्यायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. चर्चेनंतरच ६ फेब्रुवारीस महापौरांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. अद्याप या प्रक्रियेला वेळ आहे. मी मुंबईला जात असून, कोणाला संधी द्यायची याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी चर्चा करणार आहे. त्यानंतर ज्या नावावर एकमत होईल त्याची घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंना टोला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत भाष्य करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर महाजन यांनी टीकास्त्र सोडले. दुसऱ्यांच्या पक्षात काय चालल आहे, हे बघण्यापेक्षा ठाकरेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असा टोला महाजन यांनी लगावला. मनसेचे आमदार निवडून येत नाही. नगरसेवक निवडून आले तरी ते दुसऱ्या पक्षात जातात यावर ठाकरे यांनी चिंतन करावे. नाशिकमध्ये मनसेचा निवडून आलेल्या एकमेव महिला नगरसेविका आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याचा दावा महाजन यांनी केला.

  ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महिलाराज

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महिलाराज महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसतानाही शिवसेनेकडून लाडक्या बहिणींची वर्णी- एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर ठाणे, महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर निवडीची प्रक्रिया सर्व ठिकाणी सुरू असून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये यंदा अनपेक्षित पध्दतीने महिलाराज येणार आहे. महापौरपदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिवसेनेचे पक्षनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील लाडक्या बहिणींवर विश्वास दाखवला आहे. ठाण्यातून शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण डोंबिवलीत हर्षाली थविल चौधरी आणि उल्हासनगर येथे अश्विनी निकम यांची महापौरपदी वर्णी लागणार आहे. लाडक्या बहिणींनी शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महापौरपद देताना लाडक्या बहिणींनाच प्राधान्य द्यावे अशी आग्रही भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर आता महिलाराज दिसणार आहे. महिलांसाठी पद आरक्षित नसताना त्यांना हे पद मिळण्याची ही या पालिकांच्या इतिहासातली पहिलीच वेळ आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार हे निकालातून स्पष्ट झाले होते. त्यामुळेच निकालानंतर शिवसेना कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. या तिन्ही ठिकाणची महापौरपदे महिलांसाठी आरक्षित झालेली नव्हती. त्यामुळे पुरूषांनाच तिथे संधी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती.परंतु, ती चुकीची ठरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तीनही महापालिकांची जबाबदारी आपल्या पक्षाच्या लाडक्या बहिणी असलेल्या महिला नगरसेवकांकडे सोपवली आहे. विशेष म्हणजे महापालिकांमध्ये महिला आरक्षण नसतानाही जाणीवपूर्वक हा निर्णय घेत महिलांना संधी देण्यात आली आहे.एकनाथ शिंदे यांनी आजवर लाडक्या बहिणींच्या सबलीकरणाला प्राधान्य दिलेआहे. त्यामुळेच महिलांना संधी ही आरक्षणाची वाट न पाहता कुवतीनुसार मिळावी हा विचार करून तीनही महापालिकांमध्ये महापौरपदासाठी नगरसेविकांची निवड करण्यात आली आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. चौकट शिवसेनेच्या महिलांचा वरचष्मा मुंबई महापालिकेतही शिवसेनेच्या २९ पैकी १९ महिला नगरसेविका आहेत. मुंबईतील युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेला ९० जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी ६३ जागी शिवसेनेने महिला उमेदवार दिल्या होत्या हे विशेष.नगरपालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेचे ६० नगराध्यक्ष निवडून आले. त्यापैकी ३३ महिला आहेत. त्यामुळे शिवसेनेत नगरपालिकांमध्येही लाडक्या बहिणींचे राज्य कायम राहणार आहे.