दहिसर येथे १४१ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान

कल्याण: निरंकारी मिशनच्या “नर सेवा, नारायण पूजा” या दिव्य शिकवणीचा अंगीकार करून आणि त्याची निःस्वार्थ कृतीतून प्रचिती देत, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, दहिसर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १४१ निरंकारी भक्तांनी उत्साहपूर्वक रक्तदान केले. शिबिरातील रक्त संकलन संत निरंकारी ब्लड बँक, विलेपार्ले यांच्या माध्यमातून करण्यात आले.

सामाजिक व मानवतावादी सेवेची दीर्घ परंपरा जपत, निरंकारी मिशनने मागील काही महिन्यांत मुंबई तसेच राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. विशेष म्हणजे, या शिबिरांच्या मालिकेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मानवतेच्या सेवेसाठी समर्पण भावनेने योगदान देणाऱ्या भक्तांची संख्या खरोखरच कौतुकास्पद आहे.

रक्तदान शिबिराचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक राज सुर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या शिबिरास उपस्थिती दर्शविली. यामध्ये बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास लोकरे, रामा विश्वकर्मा तसेच सेवादलाचे क्षेत्रीय संचालक मुकुंद देवे उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी या शिबिराला सदिच्छा भेट देत निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले.

संत निरंकारी मंडळाच्या स्थानिक शाखेचे मुखी घनश्याम विश्वकर्मा यांच्या देखरेखीखाली, सर्व सेवादल स्वयंसेवकांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *