भारताकडे २५ दिवसच
पुरेल इतका इंधनसाठा!
नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभुमिवर सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. भारतात सध्या कच्च्या तेलाचा आणि शुद्ध इंधनाचा साठा सुमारे २५ दिवस पुरेल इतका आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.
“भारताकडे २५ दिवसांचा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) साठा आणि २५ दिवसांचा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. तर, भारताकडे एकूण ८ आठवड्यांचा कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा आहे. भारताचे केवळ ४०% कच्चे तेल ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून’ येते, तर उर्वरित ६०% कच्चे तेल इतर स्रोतांमधून येते. “भारत मागील करारांनुसार रशियन कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवणार आहे”, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं.
मध्यपूर्वेतील वाढता तणाव लक्षात घेता, अधिकारी कच्च्या तेलासह एलपीजी आणि एलएनजी आयातीसाठी पर्यायी देशांच्या शोधात आहेत. तसंच, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तात्काळ वाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचंही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
