Month: March 2026

उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २ एप्रिलला गडकरीमध्ये

उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २ एप्रिलला गडकरीमध्ये रंगतदार प्राथमिक फेरी ठाण्यात उत्साहात संपन्न ठाणे : सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा यांच्या सहकार्याने मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट आयोजित उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची रंगतदार प्राथमिक फेरी ठाण्यात उत्साहात पार पडली. अंतिम फेरी २ एप्रिलला सकाळी ११ वाजल्यापासून गडकरी रंगायतन, ठाणे येथे पार पडणार आहे. २२ मार्च रोजी गडकरी रंगायतन, तालीम हॉल मध्ये उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली.  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांचे वय हे ५० किंवा त्यापेक्षा जास्त असावं, या विशेष नियमामुळे ही स्पर्धा इतर स्पर्धांपेक्षा वेगळी ठरत आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून ठाणे, नवी मुंबई, मुंबई, चिपळूण, अलिबाग, नाशिक, सोलापूर, सातारा, कल्याण, पुणे इथल्या एकूण १५ संघांनी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. सॉफ्ट कॉर्नरचे एमडी आणि सीईओ दिलीप कुलकर्णी, त्यांच्या पत्नी आणि मुलासह स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि अनोख्या स्पर्धेचे कल्पनासूचक रवी मिश्रा देखील प्राथमिक फेरीतील एकांकिकांचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित होते. प्राथमिक फेरीसाठी एकांकिका, नाटक, सिनेमा, मालिका या क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाचा अनुभव असलेले विशाल कदम आणि विनोद जाधव हे परीक्षक होते. वयाची पन्नाशी उलटल्यानंतर राहून गेलेल्या किंवा जबाबदाऱ्यांमुळे मागे ठेवलेल्या इच्छा आणि कलागुणांना पुन्हा एकदा नव्याने वाव देता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांच्या जोश आणि उत्साहात आपण कुठे मागे पडतोय असेही होऊ नये म्हणून खास या वयोगटासाठी ही स्पर्धा आणि त्याला नवीन संहिता, उत्तम अभिनय याद्वारे मिळालेला प्रतिसाद याचे दोन्ही परीक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आणि सहभागी संघांना प्रोत्साहन दिले. तरुण वयात अनुभवलेला किंवा काही कारणास्तव राहून गेलेला रंगमंचावर प्रयोग सादर करण्याचा जोश अनेक वर्षांनी पुन्हा अनुभवता आला, अशा प्रतिक्रिया अनेक स्पर्धकांनी दिल्या. त्याचबरोबर स्पर्धेच्या आयोजनाचे आणि नियोजनाचे सुद्धा कौतुक केलं. स्पर्धेला आलेल्या प्रतिसादाचं कौतुक करत ही स्पर्धा अजून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावं, अशी इच्छा स्पर्धेचे आयोजक मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे प्रमुख प्रफुल्ल गायकवाड, कल्पिता पावसकर आणि शिशिर कोण्णुर यांनी व्यक्त केली. प्राथमिक फेरीतून प्राण, मुंबई – ‘साठी’, कला संस्कृती, ठाणे – ‘आर्टिकल २१’, रंगा थिएटर्स, ठाणे – ‘तरुणाई’, मित्र सहयोग, ठाणे – ‘अनोळखी’, ठाणे आर्टगिल्ड – ‘ती येते आणिक जाते’ या पाच एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. दमदार नाट्यप्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी शिशिर – ९९२०१३७८०५, प्रफुल्ल – ९००४९१२४६८, कल्पिता – ९१६७२४६८३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

गावदेवी मंडईत दहशत, भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला

गावदेवी मंडईत दहशत, भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला भाजप नगरसेवक संजय वाघुले यांची कठोर कारवाईची मागणी ठाणे : महापालिकेच्या गावदेवी मंडईत काही समाजकंटकांमुळे दहशत पसरली असून, एका समाजकंटकाने भाजी विक्रेत्यावर सोमवारी दुपारी हल्ला केला. या हल्ल्यात भाजी विक्रेता जखमी झाला आहे. या प्रकाराने विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी आरोपीविरोधात व प्रवेशद्वार बळकावणाऱ्या बेकायदा विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गावदेवी भाजी मंडईच्या प्रवेशद्वारावर बेकायदा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मंडईत ये-जा करणाऱ्या ग्राहकांनी तक्रार केल्यास, बेकायदा विक्रेत्यांकडून ग्राहकांना शिविगाळ केली जाते.त्यातील एक विक्रेता समाजकंटक नवनाथ वायकर याच्या आईचे मंडईत गाळे आहेत. मात्र, त्याच्याकडून व त्याच्या काही साथीदारांकडून प्रवेशद्वारालगत दुकाने उभारून अधिकृत भाजी विक्रेत्यांवर दादागिरी केली जात आहे. तसेच अनेक गाळेधारकांना मारहाणही करण्यात आली, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. गावदेवी मार्केटमध्ये किशोर नऱ्हे यांचे तीन गाळे आहेत. तर मार्केटमध्येच नवनाथ वायकर याच्या आईच्या नावावरील तीन गाळे आहेत. त्याच्याबरोबर अनेक गाळेधारकांचे सातत्याने वाद होत आहेत. मार्केटमधील एक जादा गाळा किशोर नऱ्हे यांच्या नावावर आहे. त्याच्या ताब्यावरून नवनाथ याच्याकडून धमक्या दिल्या जात होत्या. मार्केटमध्ये दिसल्यास जिवंत सोडणार नाही, अशी त्याने धमकी दिली होती, असे किशोर नऱ्हे यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. गावदेवी मंदिराबाहेरील श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्ताने गाळेधारकांकडून बुधवारी वर्गणी जमा केली जात होती. त्यावेळी नवनाथ याने किशोर नऱ्हे याच्यावर शहाळे सोलण्याच्या सुऱ्याने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. नवनाथ याने गाळेधारक अलका काजळे व प्रमिला कोल्हे यांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच पंकज काजळे यांनाही मारहाण केली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे गावदेवी भाजी मंडईमध्ये घबराट पसरली आहे. गावदेवी मंडईतील मूळ विक्रेते हे बेकायदा विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे हैराण झाले आहेत. या अतिक्रमणांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला.

ग्रामीण विकास, डिजिटल पारदर्शकता, सामाजिक सक्षमीकरणाला गती देणारा रु. ११६.९९ कोटीचा अर्थसंकल्प – रणजित यादव

ग्रामीण विकास, डिजिटल पारदर्शकता, सामाजिक सक्षमीकरणाला गती देणारा रु. ११६.९९ कोटीचा अर्थसंकल्प – रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या हा अर्थसंकल्प केवळ निधी वाटपाचा दस्तऐवज नसून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सक्षम, सुरक्षित आणि स्वावलंबी बनविण्याचा संकल्प आहे. सर्वांगीण ग्रामीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा, जलसुरक्षा व शाश्वत कृषी, सामाजिक सक्षमीकरण आणि डिजिटल पारदर्शक प्रशासन या पाच प्रमुख तत्वांवर आधारित हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. ई-गव्हर्नन्स व डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले. सन २०२६-२७ या वर्षासाठी एकूण अंदाजपत्रकीय जमा रु. ११६.९९ कोटी इतकी असून एकूण खर्च रु. ११६.९३ कोटी प्रस्तावित करण्यात आला आहे. वर्षअखेरीस रु. ५.८४ लाख इतकी शिल्लक अपेक्षित आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाने, उपायुक्त पशुसंवर्धन वल्लभ जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुल, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे आदी अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा मूळ अर्थसंकल्प बुधवार, २५ मार्चला सकाळी ११ वाजता बी. जे. हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्याकडे अर्थसंकल्पाची प्रत सुपूर्द केली. राज्यातील नागरी व ग्रामीण संस्कृतीचा समतोल साधत ठाणे जिल्हा परिषद ही विकासाच्या दृष्टीने अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. अशा या जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७चा मूळ अर्थसंकल्प सादर करताना मला अभिमान वाटतो. या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विकासाचा प्रत्येक पैलू लक्षात घेऊन रचनात्मक व परिणामकारक नियोजन करण्यात आले आहे. पंचायत सशक्तीकरण, ग्रामीण आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ठाणे जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळाले आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागासाठी रु. १.१५ कोटी तर संकीर्ण सामान्य प्रशासनासाठी रु. २.६१ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी रु. ११.३६ कोटी तर प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी रु. २.०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी बांधकाम विभागासाठी सर्वाधिक रु. १९.८७ कोटी निधी देण्यात आला आहे. लघुपाटबंधारे व जलसंधारण विभागासाठी रु. २.४८ कोटी, तर आरोग्य विभागासाठी रु. ३.७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी रु. २ कोटी निधी प्रस्तावित आहे. कृषी विभागासाठी रु. ३.७४ कोटी तर पशुसंवर्धन विभागासाठी रु. ३.७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागासाठी रु. ९.७९ कोटी व दिव्यांग कल्याणासाठी रु. ३.०५ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी रु. ४.८९ कोटी तर ग्रामपंचायत विभागासाठी मुद्रांक शुल्क वाटपासाठी रु. ३७.५० कोटी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी रु. ३.६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वित्त विभागासाठी विविध प्रशासकीय बाबींसाठी सुमारे रु. ०.६७ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारे सर्व विभागांना समतोल निधी वाटप करून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी माहिती दिली आहे.

नाशिकमध्ये बिबट्यांच्या रेस्क्यूसाठी मिळणार ११ नवीन वाहने

नाशिकमध्ये बिबट्यांच्या रेस्क्यूसाठी मिळणार ११ नवीन वाहने मानव-वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल! हरिभाऊ लाखे नाशिक: जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हालचाली व मानव-वन्यजीव संघर्ष लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीमार्फत दरवर्षी काही निधी मंजूर केला जातो. यावर्षी १७ कोटींचा निधी वनविभागाला देण्यात आला आहे. त्यातून विविध उपाययोजना करून बिबट्यांवर नियंत्रणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या बिबट्यांनी जिल्ह्यात हैदोस घातला आहे. त्यातून वन्यजीव व मानव संघर्ष वाढत आहेत. नागरिकांमध्ये याविषयी भीतीचे वातावरण आहे. वन विभागातर्फे त्याबाबत नियोजन केले जात आहे. मात्र पुरेशी यंत्रणेसाठी निधीची आवश्यकता होती. जिल्हा नियोजनमधून या पूर्वी केवळ एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र बिबट्याचे वाढते प्रमाण व त्याचा रेस्क्यूसाठीची यंत्रणा, साहित्य यासाठी ती रक्कम अत्यल्प होती. त्यामुळे वनविभागाने पुन्हा जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करून पुन्हा नव्याने १७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. सध्या म्हसरूळ येथे बिबट्यांचा निवारा आहे. वनविभाग रेस्क्यू नंतर त्या ठिकाणी ठेवतात. मात्र सध्या वाढत्या बिबट्यांची संख्या लक्षात घेता ती पुरेशी नाही. त्यामुळे वनविभागाने जिल्हा नियोजन विभागाकडे निधीची मागणी केली होती. त्यातून वनविभाग बिबट्याचा निवारा वाढविणार आहे. त्यामुळे नियोजन विभागाने १७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.   १७ कोटी रुपये वनविभागाला बिबट्या नियंत्रणासाठी दिले आहेत. तसेच ११ वाहने उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून बिबट्यांचे रेस्क्यू व त्यांचे व्यवस्थापनावर खर्च करण्याचे नियोजन आहे. – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

राजकारण्यांची बुवाबाजी

राजकारण्यांची बुवाबाजी जगात ‘एपस्टीन’ आणि राज्यात ‘खरात स्टिंग’ अशी दोन प्रकरणा सध्या गाजत आहेत. एपस्टीन वरून लक्ष वळवण्यासाठी कदाचित युद्ध सुरू झाले असे मानणारे काही तज्ज्ञ आहेत.नासिकला पकडला गेलेला कॅप्टन…

भारत आनंदी का नाही?

भारत आनंदी का नाही? २० मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्र संघाच्या सस्टनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे दरवर्षी एक सर्व्हे केला…

महागाईच्या लाटेत भारताला दिलासा

महागाईच्या लाटेत भारताला दिलासा मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरात महागाईची नवी लाट उसळण्याची शक्यता वर्तवली जात असताना, स्टेट बँकेच्या संशोधन अहवालाने भारतासाठी तुलनेने आशादायी चित्र मांडले आहे. इराणकेंद्री तणाव…

साठवणुकीत दिलासा, उद्योगांना फटका

साठवणुकीत दिलासा, उद्योगांना फटका तेलटंचाईच्या काळात दिलास्याची बाब म्हणजे देशातील अनेक ठिकाणी तेल आणि वायूची भूमिगत साठवण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे, क्रुड ऑईलच्या शुद्धीकरणात मिळणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून…

बेकायदेशीर कर्जवसुलीविरोधात अ‍ॅड. श्वेता सराफ उतरल्या रस्त्यावर

बेकायदेशीर कर्जवसुलीविरोधात अ‍ॅड. श्वेता सराफ उतरल्या रस्त्यावर अनिल ठाणेकर ठाणे, ठाण्यातील अ‍ॅड.श्वेता सराफ यांनी सार्वजनिक रस्त्यांवर कार्यरत असलेल्या बेकायदेशीर कर्ज वसुली एजंटांच्या वाढत्या उपस्थिती बद्दल कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एक गंभीर चिंता औपचारिकपणे व्यक्त केली आहे. रस्त्यावर बेकायदेशीर पद्धतीने कर्जवसुली करणार्‍या एजंटांविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. काही अज्ञात व्यक्ती वाहन क्रमांकाची यादी घेवून रस्त्यावर वाहनचालकांना अडवून जबरदस्तीने कर्जवसुली करण्याचा प्रयत्न करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. काही अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या मधोमध वाहने थांबवत आहेत, नागरिकांशी वाद घालत आहेत आणि बळजबरीने व बेकायदेशीर मार्गांनी कर्जाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. संबंधित पोलीस अधिकार्‍यांकडे एक लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यात असे नमूद केले आहे की, अशी कृत्ये बेकायदेशीर असून ती छळवणुकीच्या स्वरूपाची आहेत आणि सार्वजनिक सुरक्षा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करतात. वसुली एजंटांना रस्त्यावर वाहने थांबवण्याचा किंवा वसुलीसाठी बळाचा वापर करण्याचा कोणताही अधिकार नाही. वकील श्वेता सराफ यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि रस्त्यावर कोणतीही अज्ञात व्यक्ती अशी कृत्ये करताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी यावर जोर दिला की, जबाबदार नागरिक म्हणून आपण कोणतीही बेकायदेशीर कृती सहन करू नये, जरी ती कर्ज थकवणार्‍यांशी संबंधित समस्या असली तरी. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीचा छळ किंवा बेकायदेशीर वागणूक दिली जाऊ शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.    

कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी गुलदस्त्यात, महसूल विभागाची तिजोरी रिकामीच

कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी गुलदस्त्यात, महसूल विभागाची तिजोरी रिकामीच राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील शेकडो विट भट्टी मालकांना मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडुन किती राॅयल्टी वसुल केली हे  गेली दोन वर्षांपासून गुलदस्त्यात असल्याने महसुल विभागाची तिजोरी रिकामीच असल्याचे दिसून येत असल्याने महसूल विभागाचे शेतच कुंपण खात असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.. मुरबाड तालुक्यातील शेकडो विट भट्टी मालक हे आक्टोबर नोव्हेंबर मध्ये विट भट्टी चा व्यवसाय सुरू करत असतात .हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ते प्रथम आपली जागा अकृषिक करतात.तसेच विट उत्पादनासाठी लागणारी माती शासन दरानुसार तहसीलदार कार्यालयाकडे राॅयल्टी भरतात.सालाबादप्रमाणे हे व्यावसायीक तहसीलदार कार्यालयात न चुकता आपली राॅयल्टी भरत असतात.परंतु सन २४-२५ या वर्षात तालुक्यातील शेकडो विट भट्टी मालकांनी  राॅयल्टी भरली नसल्याने तहसीलदार कार्यालयाकडून सुमारे १७५ व्यवसायीकांना  जुलै २०२५ राॅयल्टीची दंडात्मक  नोटीस देण्यात आली.ती कारवाई गुलदस्त्यात असताना चालू वर्षी केवळ १९ व्यवसायीकांना नोटीस पाठवुन कागदी घोडे नाचवत असल्याचा प्रकार केला आहे.  एक प्रकारे त्यांना सवलत देण्यात आल्याने शेकडो विट भट्ट्यांचे माध्यमातून सालाबादप्रमाणे तहसीलदार कार्यालयात जमा होणारे कोट्यवधी रुपये गेले कुठे? हा संतप्त सवाल उपस्थित केला जात असल्याने शासनाला विविध योजना राबविण्यासाठी लागणारा निधी मिळविण्यात  महत्वाचा दुवा असलेला असलेला महसूल विभागच या राॅयल्टी चे माध्यमातून शासनाचे तिजोरीची लुटमार करत असेल तर महसुल विभागाचे शेतच कुंपन खात असल्याचे स्पष्ट होत आहे. विट पिकवण्यासाठी लागणारा दगडी कोळसा दररोज हजारो टन विक्री होत असुन त्याला कोणत्याही प्रकारची राॅयल्टी आकारली जात नाही. सध्या मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते पेव्हर ब्लॉक ने तयार केले जात असल्याने.तालुक्यात ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉक चे तसेच सिमेंट पोल.व सिमेंट प्लेट तयार करण्यासाठी लागणारी खडी ,व रेती शेकडो ब्रासने वापरली जात असुन या व्यवसायीकांवर देखील राॅयल्टी आकारली जात आहे. मी किरकोळ विटांचे उत्पादन करतो तरी जबरदस्तीने राॅयल्टी घेतली.तिचे चलन भरणा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातुन संमती पत्र मिळत नाही. परंतु जे विट भट्टी मालक केवळ शंभर ब्रास राॅयल्टी काढतात आणि सुमारे पंचवीस ते तीस लाख विटांचे उत्पादन घेतात.त्यांना आजपर्यंत तहसीलदार कार्यालयाकडून राॅयल्टी दिली नाही. एक विट भट्टी मालक. याबाबत गौण खनिज दक्षता पथकाने निरिक्षक संजय जाधव व उपविभागीय अधिकारी कल्याण.विश्वास गुजर.यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.