‘२०० कोटींची भीक नको, न्याय हक्क हवा’ – कामगारांचा निर्धार
कल्याण : मुंबई येथे पार पडलेल्या मॅनेजमेंट आणि कामगार युनियन यांच्या बैठकीत कामगारांसाठी २०० कोटी रुपये मंजूर झाल्याचे वृत्त समोर आले होते. एन.आर.सी कंपनीतील नव्या वेतन कराराविरोधात कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात कामगार एकजूट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकत्याच महादेव मंदिर यादव नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या बैठकीत शेकडो कामगार उपस्थित होते नव्या कराराचा निषेध करत कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत उपस्थित कामगारांनी ‘२०० कोटींची भीक नको, आमच्या हक्कांचा योग्य मोबदला द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नव्या करारामुळे कामगारांचे आर्थिक आणि सेवा विषयक नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अनेक वर्षे वाट पाहून कामगारांच्या पदरात जर काहीच पडत नसेल तर असा करार काय कामाचा असा सवाल कामगार नेते भीमराव डोळस, माजी नगरसेवक जे.सी कटारिया, शाहीर अर्जुन पाटील, वासुदेव पाटील, अविनाश नाईक या कामगारांनी उपस्थित केला
कामगारांनी एन आर सी मजदूर संघावरही गंभीर आरोप करत संघटनेच्या भूमिकेमुळे कामगारांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला. “कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी संघटनेने व्यवस्थापनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून त्यामुळे हजारो कामगारांची वाट लागली आहे,” अशी टीका बैठकीत करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद दिघे यांच्या प्रतिमा झळकत होत्या. कामगारांनी केंद्र व राज्य सरकारकडे आपल्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कामगार नेत्यांनी सांगितले की, कामगारांच्या हिताला बाधा पोहोचवणारा कोणताही करार स्वीकारला जाणार नाही. आगामी काळात मोठ्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी विविध बैठका घेण्यात येणार असून सर्व कामगारांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
