Month: March 2026

हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त महिला मेळावा

योगेश चांदेकर पालघर- डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील पांचाळ समाज सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.  महिला ही अबला नसून ती माता लक्ष्मी, सरस्वती, जगदंबा, दुर्गा, चंडिका, रणचंडी चे रूप आहे.  महिला सक्षमीकरण महिलांचा सन्मान, समान हक्क, त्यांचा अधिकार आहे. आई , बहीण, सून, मैत्रीण, पत्नी, अशा विविध भूमिका ती निभावत असते, आणि आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला आधार देत असते, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र गावित यांनी केले. या महिला मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, राज्यमंत्री मनीषा ताई निमकर, वैदही वाढाण, सहसंपर्क प्रमुख केदार काळे, तालुका प्रमुख रवी चौधरी, संजय चौधरी, शिवसेना युवा प्रमुख साइराज पाटील, पालघर शहर प्रमुख राहुल घरत, शहर महिला संघटिका दीपा पमाळे, भारती सावे, नीलम म्हात्रे, सर्व शिवसेना पदाधिकारी, युवा सेने पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिष्ठित ‘पंजाब मेल’ ट्रेन महोत्सव होणार साजरा

प्रतिष्ठित ‘पंजाब मेल’ ट्रेन महोत्सव होणार साजरा (राजेंद्र साळसकर) मुंबई- मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ऐतिहासिक ‘पंजाब मेल’ (ट्रेन क्रमांक १२१३७/१२१३८) च्या ‘ट्रेन महोत्सवा’चे आयोजन करत असल्याची घोषणा मोठ्या  अभिमानाने केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गाडी सुटण्याच्या एक तास आधी, म्हणजेच ३० मार्च २०२६ रोजी  संध्याकाळी ६.३५ वाजता, या उत्सवाला सुरुवात होईल. या गाडीला वारसा-आधारित  नक्षीकाम आणि दृश्यांनी सुशोभित करण्यात येईल; जे तिचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करेल. हा सोहळा ‘पंजाब मेल’च्या प्रवासाचा लक्ष  वेधून घेईल, जी भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या आणि अत्यंत प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक आहे,. ‘ट्रेन महोत्सव’ उपक्रमाचा एक भाग म्हणून, ‘पंजाब मेल’ची ऐतिहासिक मोहिनी अबाधित राखतच, प्रवाशांचा आराम व सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने या गाडीचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे: आतील भाग (प्रथम वातानुकूलित), उत्तम सौंदर्यासाठी कूपै आणि आयल पॅनेलवर विनाइल रॅपिंग. बाहेरील ब्रँडिंगमध्ये प्रथम वातानुकूलित-  द्वितीय वातानुकूलित संयुक्त कोच आणि पॅन्ट्री कारवर वारसा-थीम असलेल्या चित्रांसह विनाइल रॅपिंगने केले गेले आहे. पंजाब मेलचा १९१२ चा वारसा, महाराष्ट्र-पंजाब संबंध आणि स्वातंत्र्य लढ्याशी असलेला संबंध दर्शवणारी रचना; ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया आणि सुवर्ण मंदिराचे स्क्रीन प्रिंट्स आहेत. वातानुकूलित कोचच्या  आत वॉटरप्रूफ कॅनव्हास प्रिंट्स, ज्यामुळे संग्रहालयासारखा अनुभव मिळतो.  सर्व वातानुकूलित कोचमध्ये नवीन पडदे पुरवले आहेत. ऑटो एअर फ्रेशनर्स, सीट कव्हर डिस्पेंसर, सुधारित बिब कॉक, सोप डिस्पेंसर, पीव्हीसी फ्लोअरिंगची दुरुस्ती आणि स्क्रॅपर मॅट्सची तरतूद. सामायिक जागा: अधिक टिकाऊपणासाठी गँगवे, दरवाजे आणि शौचालयांमध्ये विनाइल रॅपिंग. फलक: सर्व कोचमध्ये एकसमानता आणण्यासाठी वारसा-थीम असलेले फलक. फायनल टच: अधिक सुबक आणि आकर्षक दिसण्यासाठी फिटिंग्जवर रंगाचा फायनल टच-अप करण्यात आला आहे. पंजाब मेल, जी मूळतः पंजाब लिमिटेड म्हणून ओळखली जात होती, ही भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, ती प्रसिद्ध फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षांहून अधिक जुनी आहे.बॅलार्ड पिअर मेल स्टेशन एकेकाळी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआयपीआर) सेवांसाठी एक प्रमुख केंद्र होते, जिथून पंजाब मोलचा प्रवास सुरू होत असे. दि. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल येथून या गाडीने आपला पहिला प्रवास सुरू केला. अनेक दशकांपासून, प्रचंड ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला हा प्रवास मुंबईला उत्तर भारताशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा राहिला आहे. ‘पंजाब मेल’ ही केवळ एक रेल्वेगाडी नाही; तर तो एक जिवंत वारसा आहे, ज्याने पिढ्यान- पिढ्या विविध प्रदेश, लोक आणि इतिहास यांना परस्परांशी जोडले आहे. आपल्या खोलवर रुजलेल्या वारशासह आणि सातत्याने होत असलेल्या आधुनिकीकरणामुळे, परंपरा आणि आधुनिक प्रवासी सुविधा यांचा सुरेख मेळ घालण्याच्या ‘मध्य रेल्वे’च्या कटिबद्धतेचे ती एक प्रतिक म्हणून उभी आहे.  मध्य रेल्वे प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेला वारसा, जुन्या आठवणी आणि प्रगती यांच्या या उत्सवाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करते.

मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर

मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांवर मोठा भर महापालिकेतील कामाविषयी आमदारांचं पत्रकारांसमोर स्पष्टीकरण अरविंद जोशी मिरा-भाईंदर : शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका कडून संतुलित अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून शिक्षण, आरोग्य, परिवहन व पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल घडवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुढील एका वर्षात शहरात लक्षणीय बदल दिसून येतील,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.अशी माहिती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माननीय महापौर डिंपल मेहता, माननीय उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील व माननीय स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेत CBSE बोर्ड सुरू करण्याचा विचार पुढे आणण्यात आला आहे. तसेच एका वर्गात ५० टक्के खाजगी विद्यार्थी व ५० टक्के महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश करण्याचा अभिनव प्रयोग, यासोबतच शिक्षण संस्थांनी शाळा दत्तक घेण्याची संकल्पना, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सेवा सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.याच बरोबर क्रीडा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपक्षण केंद्र, पशु चिकित्सक, अग्निशमन संगणक, मालमत्ता शोध मोहीम, जेष्ठ नागरिक, तलाव सुशोभीकरण, नवीन रस्ते, नाले, वैध्यकीय विभाग, औषध आरोग्य केंद्र, घणकचरा अश्या अनेक गोष्टीचा देखील अर्थ संकल्पात समावेश करण्यात आला आहे. 100 नवी शौचालय, विद्यमान शौचालयांची स्थिती सुधारली जाणार आहे. वाहतूक व बाजार व्यवस्थापनासाठी रामदेव पार्क आणि मिरारोड स्थानक परिसरात तळमजल्यावर फेरीवाल्यांसाठी व्यवस्था व त्यावर पार्किंग सुविधा उभारण्यात येणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचेही स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. तसेच १० एप्रिलपासून शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या कामांना सुरुवात होणार आहे. पाणी व्यवस्थापनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, परिवहन सेवेतही सुधारणा, आरोग्य क्षेत्रात मोठा निर्णय घेत शहरात MRI मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरवठा आणि डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. एकूणच, या अर्थसंकल्पातून मिरा-भाईंदर शहराच्या विकासाचा रोडमॅप स्पष्ट झाला असून आगामी काळात नागरिकांना अधिक सुविधा आणि सुधारित पायाभूत व्यवस्था मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्लेझन्ट पार्क परिसरात लागलेल्या आगीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे, तसेच यासंदर्भात आलेल्या प्रस्तानावर विचार चालू असल्याचे आमदार नरेंद्र मेहता म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरं देत होते. आगी नंतरच्या केलेल्या पाहणीत आमदार तसेच महापौर आणि उपमहापौर यांनी लोकांना नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं होतं.

४८व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन) राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या ज्येष्ठांचा ‘पराक्रम’

जिद्द, अनुभव आणि खेळातील उत्कटतेची दोन कांस्य पदकांत झळाळी! गोवा येथे उत्साहात पार पडलेल्या योनेक्स-सनराईज ४८व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन) राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मध्ये देशभरातील तब्बल २००७ खेळाडूंनी सहभाग नोंदवत स्पर्धेची प्रतिष्ठा अधिक उंचावली. या अत्यंत स्पर्धात्मक आणि उच्च दर्जाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडूंनी आपल्या जिद्दीच्या, चिकाटीच्या आणि खेळावरील निष्ठेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत दोन कांस्य पदकांची मानाची कमाई केली. अजिता रविंद्रन यांनी महिला एकेरी ५० वर्षांखालील गटात तर विनोद धराप यांनी पुरुष दुहेरी ७५ वर्षांवरील गटात चमकदार यश मिळवत ठाण्याच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे हे दोन्ही खेळाडू केवळ ज्येष्ठच नव्हे तर तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि खेळावरील अपार प्रेम याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. महिला एकेरी ५० वर्षांखालील गटात अजिता रविंद्रन यांनी अत्यंत प्रभावी आणि लढाऊ खेळाचे दर्शन घडवले. त्यांनी पहिल्याच फेरीत गुजरातच्या आरती महेश्वरी हिला २१-११, २१-१० अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली. त्यानंतर दिल्लीच्या अंशू महाजन हिच्याविरुद्धचा सामना हा खऱ्या अर्थाने त्यांच्या जिद्दीची परीक्षा घेणारा ठरला. पहिला सेट गमावल्यानंतर त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत २२-२० असा थरारक दुसरा सेट जिंकला आणि तिसऱ्या सेटमध्ये २१-९ अशी सरशी करत सामना आपल्या नावावर केला. पुढील फेरीत उत्तर प्रदेशच्या चौथ्या मानांकित सुषमा हिला २१-५, २१-४ अशा एकतर्फी सामन्यात सहज पराभूत करत त्यांनी आपली वर्चस्व सिद्ध केले. उपांत्यपूर्व फेरीत उर्वशी थापा विरुद्धच्या चुरशीच्या लढतीत त्यांनी संयम, कौशल्य आणि अनुभव यांचा उत्कृष्ट संगम साधत २१-१६, १६-२१, २१-१७ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांना बलाढ्य प्रतिस्पर्धी शालिनी शेट्टीविरुद्ध झुंज द्यावी लागली आणि अखेर पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांच्या एकूण कामगिरीने सर्वांचे मन जिंकले. पुरुष दुहेरी ७५ वर्षांवरील गटात विनोद धराप यांनी त्यांच्या जोडीदार आनंद घाटे यांच्या समवेत उत्कृष्ट समन्वय आणि अनुभवाच्या जोरावर कांस्य पदकाची कमाई केली. त्यांनी तेलंगणाच्या रोमेश चंद्र ग्रोव्हर आणि कीर्ती मेहता या जोडीवर २१-१९, २१-१४ असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या खेळात दिसलेली समज, टायमिंग आणि कोर्टवरील उपस्थिती यामुळे प्रेक्षकांनी त्यांचे विशेष कौतुक केले. उपांत्य फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांनी दिलेली लढत अत्यंत उल्लेखनीय ठरली. या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी अत्यंत समाधान व्यक्त करत सांगितले की, “ज्येष्ठ वयोगटातही ठाण्याचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर अशी सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आणि खेळावरील प्रेमामुळे ते केवळ पदके जिंकत नाहीत, तर संपूर्ण पिढीला प्रेरणा देत आहेत.” ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनीही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, “ज्येष्ठ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश ठाण्याच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यांच्या परिश्रम, सातत्य आणि खेळातील आवड यामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.” 00000000

धोरणात्मक बदलावर जोर द्या – प्रशांत जाधवर

धोरणात्मक बदलावर जोर द्या – प्रशांत जाधवर पार्किंग प्लाझा, ए आय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातली धोरणात्मक बदलांबाबत मांडले विचार ठाणे : ठाणे शहराला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक प्रशांत ( राजा) जाधवर यांनी केले. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होत जाधवर यांनी शहराच्या ठोस विकासाची गरज बोलून दाखवताना विकासाबरोबर पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत. ठाणे महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा ६२२१ कोटी १२ रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच सादर केला. ठाणे महापालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रशांत (राजा) जाधवर यांनी अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेत वेगवेगळे मुद्दे, आर्थिक उपाय योजना आणि उत्पन्नाच्या स्त्रोताबाबत विचार मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दाखला दिला. विकासाभिमुख प्रशासनाकरिता आर्थिक नीतीची अमंलबजावणी करण्यासाठी उत्तम प्रशासकाची आवश्यकता असल्याची यशवंतराव चव्हाणांच्या वाक्याची आठवण करुन दिली. प्रशासकीय सुधारणा आणि महसूलवाढी करता जाधवर यांनी पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी वाहनतळ सुरु करणे, परिवहन सेवेत नव्याने सामील होणाऱ्या दुमजली बसेस फिरते डिजिटल फलक लावणे, महापलिकेच्या शाळा शालेय वेळेनंतर नाममात्र दरात खासगी शिबिरे, कार्यक्रमांना भाड्याने देणे, करवसुली करण्यासाठी १०० टक्के कर भरणाऱ्या गृहनिर्माण संकुलनांना विशेष सवलत देणे, स्वछ व प्रमाणिक गृहनिर्माण संकुल स्पर्धा घेण्याची मागणी केली आहे. याशिवाय शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी नवीन बांधकामांच्या जागी डास्ट कंट्रोल युनिट सक्तीचे करण्याची गरज जाधवर यांनी बोलून दाखविली. सुमारे एक कोटी रुपयांचे नगरसेवकांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यापेक्षा शहरात राष्ट्रीय महापौर परिषद आयोजित करून त्यातून विकास कामाबाबत विचाराची देवघेव करण्याची सूचना जाधवर यांनी यावेळी मांडली. पालिकेच्या शाळांची रंगरंगोटी करण्यापेक्षा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, रोबोटिक्स लॅब, परदेशी भाषांचे वर्ग सुरु करण्याची आग्रही मागणीही केली. स्वतः राष्ट्रीय कबड्डीपटू असल्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये विविध खेळांचे हाय परफॉर्मन्स सेंटर सुरु करण्याची मागणी केली. महापालिकेच्या तिजोरीत वाढ होण्यासाठी कांदळवनाभोवती लोखंडी कुंपण लावण्याऐवजी त्याठिकाणी पर्यटन क्षेत्र तयार करताना लाकडी वॉकवेज, बोटिंग सुरू करण्याची मागणी जाधवर यांनी केली. शहरातील सुमारे ९५टक्के पाण्याचे मीटर्स चोरी झाले असल्याने, सरसकट पाण्याचे मीटर हटवून त्याऐवजी १५६० रुपयांनुसार पाण्याची देयके आकारण्याची सूचना केली. शहरातील नाल्यांची पक्की डागडुजी करणे, विठ्ठल क्रीडा मैदान आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवजी महाराजांच्या स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्याची आवश्यकता असल्याची भावना जाधवर यांनी बोलून दाखवली. प्रशांत (राजा) जाधवर यांनी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) तिकिटावर प्रथमच निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात प्रभाग क्रमांक सहामधून महापालिकेत प्रवेश केला आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय शाखांच्या अनुदानासाठी कटिबद्ध

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय शाखांच्या अनुदानासाठी कटिबद्ध महापौर  रितू तावडे यांनी दिली मदतीची ग्वाही मुंबई : “वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाद्वारे चालविण्यात येणाऱ्या महानगरपालिका शाखांच्या प्रलंबित अनुदान वाढीसाठी मी पूर्णपणे सकारात्मक आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी दिली. दादर (पूर्व) स्थित मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या  ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ मध्ये मुंबईच्या महापौर  रितू तावडे या प्रमुख पाहुण्या म्हणून  उपस्थित होत्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सार्वजनिक ग्रंथालयातील उत्कृष्ट ज्येष्ठ व बाल सभासदांचा महापौर  रितू तावडे यांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.ग्रंथोत्सवातील शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयाच्या दालनास भेट देऊन महापौरांनी ‘भारताचे संविधान’ (सुधारित आवृत्ती २०२५) हा ग्रंथ स्वत: खरेदी केला. ‘हा अमूल्य ग्रंथ सर्व नगरसेवकांकडे असायला हवा, या  कार्याध्यक्ष  व द ग्लोबल टाइम्स दैनिकाच्या कार्यकारी संपादक  शीतल  करदेकर  यांच्या सूचनेचे स्वागत करुन तशी सूचना करून महापौरांनी याबाबत योग्य नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासह इतरही विविध ग्रंथ, पुस्तके यांची महापौरांनी खरेदी केली. संदर्भ विभागात मांडण्यात आलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांच्या आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. इतिहासाचा हा ठेवा जतन करणे ही काळाची गरज असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या ग्रंथसंग्रहालयातील डिजिटलायझेशन प्रकल्पाची महापौरांनी बारकाईने पाहणी केली. दुर्मिळ ग्रंथ आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कसे जतन केले जातात, या स्कॅनिंग प्रक्रियेची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांची ग्रंथोत्सवातील उपस्थिती पाहून महापौरांनी आनंद व्यक्त केला आणि ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर राज्य भाषा संचालक  अरुण गीते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे आणि कार्याध्यक्ष  शीतल करदेकर उपस्थित होते. तसेच ग्रंथपाल  मिताली तरळ,  उमा नाबर, जयवंत गोलतकर, विनायक परब यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान

अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  बृहन्मुंबई गुजराती समाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गिरनार ॲवॉर्ड समारंभात अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. रविवारी त्यांचे मुंबईत एका कार्यक्रमासाठी आगमन झाले असतांना बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. याचवेळी डॉ हेमराज शाह यांनी अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार प्रदान केला. बृहन्मुंबई गुजराती समाज तर्फे गेल्या तीस हून अधिक वर्षांपासून समाजातील विशिष्ट व्यक्तींचा, खेळाडू, कलावंत आदींना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्मारक गिरनार ॲवॉर्ड प्रदान करण्यात येतो. संतांच्या श्रेणीत अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्याप्रमाणे रविवारी हा गुजराती गौरव पुरस्कार डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वयाची ८६ वर्षं पूर्ण करणाऱ्या डॉ हेमराज शाह यांना अखिल भारती अचलगच्छ संघा तर्फे गौरविण्यात आले. अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींनी डॉ हेमराज शाह यांना आशीर्वाद देतांना सांगितले की, बृहन्मुंबई गुजराती समाजाचे महत्त्व अनोखे आणि त्यांचे योगदान अभूतपूर्व असेच आहे. अंधेरी येथील सात मजली गुजराती भवन म्हणजे आपला गौरव आहे. यात नवनीत परिवाराचे योगदान सुद्धा महत्वपूर्ण आहे. डॉ. हेमराजभाई शाह यांच्या ‘हेमूदादा’चा सुगंध या वर्षातही डोळे दीपविणारा आहे.  अचल गच्छाधिपती प. पू. कलाप्रभ महाराज यांना गुजराती गौरव पुरस्कार बृहन्मुंबई गुजराती समाजचे अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राजेश दोशी, एल एम शाह, चिमण मोता, दिनेश टी. शाह, हिराचंद दंड, नयन भेडा आणि डॉ. उर्मी पासद आदी मान्यवर उपस्थित होते.

तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात “एमएमआरडीए” प्रथम

तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात “एमएमआरडीए” प्रथम मुंबई: महाराष्ट्र  राज्यात तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात एमएमआरडीएने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई महानगर प्रदेश अधिक आधुनिक आणि डिजिटल होत असताना, “एमएमआरडीए” देखील आता अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकांसाठी सोयीस्कर अशी प्रशासन व्यवस्था उभारण्यावर भर देत आहे.  यामुळे प्राधिकरणाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आनंद होत व्यक्त होत आहे. तब्बल  १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात एमएमआरडीएने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.      तसेच, महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित १५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत ‘एमएमआरडी’एने राज्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. संजय मुखर्जी  महानगर (आयुक्त) एमएमआरडीए यांनाही प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहे. ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रम पुरस्कारासाठी सहभागी शासकीय संस्थांचे मूल्यमापन कर्मचारी विकास आणि सेवा नियमांच्या पालनाशी संबंधित ९ निकषांवर करण्यात आले. तसेच, ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ पुरस्कारासाठी नाविन्यपूर्ण डिजिटल प्रशासनाचा वापर करण्यासंदर्भातील ७ विविध निकषांच्या आधारे संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. हे यश डॉ. संजय मुखर्जी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि टीम “एमएमआरडीए”च्या प्रत्येक सदस्याच्या अथक परिश्रमाचा पुरावा आहे, ज्यांची वचनबद्धता, नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्कृष्टतेवरील विश्वास या प्रदेशाच्या परिवर्तनाला दररोज नवी ऊर्जा देत आहे.

जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन

जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन योगेश चांदेकर पालघर- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३२ व्या मन की बात कार्यक्रमाचे आज जव्हार येथे उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  माधवी  नाईक, जिल्हाअध्यक्ष भरत राजपूत, पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा, भाजपचे ज्येष्ठ नेते  बाबाजी काठोले, विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिश्चंद्र भोये तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संवादातून देशाच्या प्रगतीचा वेग, सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कथा आणि राष्ट्रनिर्मितीची नवी दिशा यांचा सखोल आढावा घेण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळेसारखेच, या कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली.

दीपक केसरकरांची भोंदू खरातवर ‘कृपा’ शालार्थ आयडी घोटाळ्यात हरिभाऊ लाखे नाशिक : दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना नाशिकचा लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरातवर ‘केसरकर कृपा’ झाल्याचे पुरावे समोर येत आहेत. राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक…