Month: March 2026

ठाण्यात भ्रष्टाचाराचे ‘गटार’ २५६० कोटींचा घोटाळा !

ठाण्यात भ्रष्टाचाराचे ‘गटार’ २५६० कोटींचा घोटाळा ! गटार पायवाटांमध्ये भ्रष्टाचाराचा भाजपाचाच आरोप  श्वेतपत्रिका काढण्याची मृणाल पेंडसे यांची मागणी सिद्धेश शिगवण ठाणे : भ्रष्ट्राचार करणाऱ्यांनी ‘गटाराला’ही सोडले नाही. गेल्या चार वर्षांत ठाणे महानगरपालिकेला राज्य सरकारकडून तब्बल…

बस्तर नक्षलमुक्त – अमित शाह

बस्तर नक्षलमुक्त – अमित शाह नवी दिल्ली :  देशाला दीर्घकाळ सतावणाऱ्या नक्षलवादाचा पुर्णता बिमोड केला  असून त्यातून देशाची मुक्तता झाली आहे. बस्तर विभागातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे, अशी घोषणा लोकसभेत ‘नक्षलमुक्त भारत’ या विषयावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  केली. शाह म्हणाले की, देशातील १२ राज्ये नक्षलवादाने प्रभावित होती. डाव्या विचारसरणीमुळे या राज्यांमध्ये नक्षलवाद पसरला होता. मात्र आता बस्तर परिसरातून नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. लाल दहशतीमुळे त्या भागात विकास झाला नव्हता. पण, आता बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा उभारण्यात आल्या. यापुढे जो कोणी शस्त्र उचलेल, त्याला कायद्याने उत्तर दिले जाईल. यावेळी शाहांनी विरोधकांवर आरोप केला की, त्यांना नक्षलवाद्यांची सहानुभूती आहे, पण आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी काही केले नाही. नक्षलवादी विचारसरणीनुसार सत्ता बंदुकीच्या जोरावर मिळते. नक्षलवाद्यांनी आदिवासी युवकांना भडकावून त्यांना शस्त्रे दिली आणि हिंसाचाराच्या मार्गावर नेले. नक्षलवादाचा विकासाशी काहीही संबंध नाही. उलट नक्षलवादामुळे त्या भागांमध्ये विकास थांबला होता. रेड कॉरिडॉरमध्ये नक्षलवादामुळे गरिबी वाढली. नक्षलवाद्यांनी शाळा जाळल्या, त्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण मिळू शकले नाही. 75 वर्षांत 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मग आदिवासी विकासापासून वंचित का राहिले? देश अनेक वर्षे नक्षलवादामुळे त्रस्त होता आणि आता नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास होत असल्याचा दावा शाहांनी केला.

पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत

पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत पनवेल – पनवेल तालुक्यामध्ये आतापर्यंत एकुण २२ शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ११ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजून उलवे येथील एका शाळेवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाची सुरू आहे. पनवेल तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी शाहू सतपाल यांनी पदभार स्विकारल्यापासून अनधिकृत शाळांविरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे. सतपाल यांनी पदभार स्विकारला त्यावेळेस १२ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक ते दोन अशा आतापर्यंत ११ अनधिकृत शाळा चालविणा-या शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापकावर सतपाल यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी (ता.२६ मार्च) शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर नेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक, अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गट शिक्षणाधिकारी सतपाल यांनी दिलेल्या तक्रारीत २०२३ पासून ही शाळा अनधिकृत चालविली जात होती. यामुळे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या शाळेत पहिली ते आठवी या इयत्तेमधील ६९ मुले शिकत होती. पनवेल तालुक्यामध्ये अजून उलवे येथील एका अनधिकृत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या व्यतिरीक्त तालुक्यामध्ये अजून १० शाळा अनधिकृत आहेत. गटशिक्षण अधिका-यांनी केंद्रप्रमुखांना अनधिकृत शाळेविषयी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये या १० शाळा अनधिकृत असल्याचे आढळले आहे.

 गारपीट-पाऊस -वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा -काजूचे उरले -सुरले पीकही धोक्यात…!

गारपीट-पाऊस -वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा -काजूचे उरले -सुरले पीकही धोक्यात…! पाच वर्षानंतर पुन्हा एकदा तडाखा…! राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच पडलेला अवकाळी पाऊस, काही भागाला बसलेला गारपिटीचा तडाखा आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा आणि काजूचे उरले- सुरले पीकही आता हातचे जाणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. तर काढणीला आलेल्या रब्बी पिकालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आंबा – काजू बागायतदार -शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. गेल्यावर्षी अवकाळी पाऊस आणि मान्सून वेळेअगोदर सुरू झाल्याने ‘कोकम’ या पिकाचे फार मोठे नुकसान झाले होते त्यामुळे त्याचे दरही वाढले होते यंदाही या पिकावर परिणाम होऊन दर वाढण्याची शक्यता आहे. कोकणची काळी -मैना म्हणून ओळखली जाणारे करवंदे यंदा खायला मिळतील की नाही याची शाश्वती नाही. शिवाय जांभुळ पिकावरही या अवकाळी पावसाचा परिणाम होणार आहे. कणकवली,देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांच्या अनेक भागात  गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि कांही भागात तर वीजेचे  खांबही कोसळले. रामनवमीच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात सकाळपासूनच प्रचंड  उकाडा जाणवत होता आणि रामनवमीच्या दिवशी सकाळपासून अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली.वैभववाडी तालुक्याच्या काही भागात तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि तालुक्यातील अनेक गावांना त्याचा तडाखा बसला. मालवण तालुक्यातील कसाल,आंब्रड,ओसरगाव,फोंडाघाट, शिवडाव आदी ठिकाणी तब्बल अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. देवगड तालुक्यातील अनेक गावांनाही पावसाने चांगलाच तडाखा दिला. बदलत्या हवामानामुळे आधीच संकटात असलेल्या आंबा – काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांची ब चिंता त्यामुळे अधिक वाढली आहे.शासकीय सर्वेक्षणानुसार बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे ९० टक्के पीक वाया गेले आहे आणि आता उरले -सुरले १० टक्के पिकही हातचे जाईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली होती त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी- बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.  

सिंधुदुर्गात सभापती निवडीतही राणे यांचे धक्कातंत्र

सिंधुदुर्गात सभापती निवडीतही राणे यांचे धक्कातंत्र प्रक्रिया बिनविरोध, राऊळ, नारकर,साटविलकर, तांबे यांची वर्णी राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.  कट्टर राणे  समर्थक भाजपाचे प्रितेश राऊत( शिक्षण व आरोग्य) आणि सुलोचना नारकर (महिला व बालकल्याण) तर शिंदे शिवसेनेचे संतोष साठविलकर (वित्त व बांधकाम )आणि रुहिता तांबे( समाज कल्याण) यांना सभापती पदाची संधी देण्यात आली आहे. या निवडीत खासदार नारायण राणे यांनी जुन्या नव्या सदस्यांना संधी दिली आहे. रेडी वेंगुर्ले इथून निवडून आलेले प्रितेश राऊळ  यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याची संधी मिळाली आहे. सुलोचना नारकर या पोंभुर्ले (देवगड ) जि. प.गटातून निवडून आल्या आहेत. शिंदे सेनेचे साटविलकर हे मालवण तालुक्यातील पेंडूर जि. प. गटातून निवडून आले आहेत. तर रोहिता तांबे या जानवली (कणकवली) या जि. प. गटातून निवडून आल्या आहेत. निवडीनंतर जि. प. चे अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जय प्रकाश परब,उपाध्यक्ष दादा साईल शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी मनीष दळवी शिंदे सेनेचे उपनेते संजय आंग्रे गटनेते संजय बोबडी यांनी बिनविरोध निवड झालेल्या सर्व सभापतींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची शिवसेनेकडून प्राथमिक मोर्चेबांधणी

ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची शिवसेनेकडून प्राथमिक मोर्चेबांधणी ठाणे:  ठाणे-पालघर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम व त्यासाठी लागणाऱ्या मतदार यादीचे काम चालू झालेले आहे. तसेच नजीकच्या काळामध्ये मतदार यादी कायम होऊन नवीन यादी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महानगरपालिका येथे महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना सचिव राम रेपाळे, महाराष्ट्र सहकार बोर्डाचे संचालक अरुण पानसरे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक मिनाक्षी शिंदे, नगरसेवक बाबाजी पाटील व शिवसेना पक्षाचे सन्मा नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेन पक्ष ज्या पध्दतीने महाराष्ट्रामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे त्याप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये यशस्वी पदार्पण करत आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रगण्‌य आहे असे मानले जाते. सहकाराच्या माध्यमातून जिल्हयातील सहकार क्षेत्रामध्ये नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे सर्व दृष्टीने एकत्र येवून ठाणे जिल्हा मध्यवर्ती व पालघर जिल्हा मध्यवर्ती निवडणूक लढवावी अशा प्रकारचे साकडे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे मांडण्याबाबतची भूमिका घेतली आहे. या संदर्भात मतदार यादी करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांचे व पतसंस्थांचे ठराव किंवा पुढील प्रक्रिया राबविण्याबाबत आज झालेल्या बैठकीमध्ये ठाणे शहरातील सर्व सन्मा. नगरसेवकांना त्याच्या प्रभागामध्ये असणाऱ्या गृहनिर्माण संस्था व पतसंस्था यांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नियमाप्रमाणे जो ठराव लागतो तो ठराव 5 तारखेच्या आत अनिल भोर, खांडेकर व ज्ञानेश्वर गायकवाड समन्वयक म्हणून त्यांचेकडून देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. सर्व पदाधिकारी, ठाणे व पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेबरोबर निवेदनाद्वारे चर्चा करतील व त्याप्रमाणे निवडणुकीची तयारी करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

जुन्या ठाणे शहराच्या विकासाचा महापालिकेला विसर : नम्रता कोळी

जुन्या ठाणे शहराच्या विकासाचा महापालिकेला विसर : नम्रता कोळी फेरीवाल्यांवरील दंड ५ हजार रुपये करावा ठाणे  : ठाणे महापालिकेने नव्या ठाणे शहरात विविध विकास प्रकल्प राबवितानाच, जुन्या ठाणे शहराचा विसर पडू देऊ नये, अशी सूचना भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय चर्चेवेळी केली. तसेच शहराच्या विविध भागातील फेरीवाल्यांकडील साहित्य जप्त केल्यानंतर १२०० रुपयांऐवजी किमान ५ हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणीही नम्रता कोळी यांनी केली. ठाणे महापालिकेकडून नव्याने वसलेल्या ठाणे शहरात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांबद्दल आनंद आहे. परंतु, नवे प्रकल्प राबविताना जुन्या शहराचा विचार करायला हवा. गायमुख, नागला बंदर, बाळकूम, कोपरी येथे खाडीकिनारी सुशोभिकरण व पर्यटन सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, माझ्या प्रभागातील व जुन्या ठाण्यातील महागिरी खाडी परिसराला वगळण्यात आले. या खाडीत साचलेला गाळ नालेसफाईच्या मोहिमेतून काढण्याची मागणीही पूर्ण झालेली नाही, याबद्दल नम्रता कोळी यांनी खंत व्यक्त केली. ठाणे शहराच्या विविध भागातून येणारे सांडपाणी प्रक्रियेविना थेट खाडीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारावे, अशी मागणीही त्यांनी केली. ठाणे रेल्वे स्टेशन ते कोर्ट नाका, अशोक टॉकीज ते सिडको बस स्टॉप, सिद्धिविनायक मंदिर ते तलावपाळी पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यांच्याविरोधात महापालिकेकडून ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. या रस्त्यावरूनच टीएमटीची वाहतूक सुरू असल्याने लाखो लोक सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी अतिक्रमण विरोधी पथकाची जीप फिरती ठेवावी. तसेच बेकायदा फेरीवाल्यांकडून सामान व साहित्य जप्त केल्यानंतर ते सोडविण्यासाठी किमान ५ हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली. तसेच जुन्या स्टेशन रोडवर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी १० वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासमोरील शाळा क्र. १ बंद आहे. या शाळेच्या ठिकाणी नवी इमारत उभारून तेथे महापालिकेची सीबीएससी शाळा सुरू करावी. तसेच चरई येथील जलकुंभासाठी तरतूद करावी, अशी मागणीही नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली.

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव अनिल ठाणेकर ठाणे, महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने आता डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानांतर्गत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे ठाणे जिल्हा आज संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी मॉडेल म्हणून उदयास आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ठाणे जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव करण्यात आला. प्रशासकीय पारदर्शकता वाढविण्यासाठी डॉ.पांचाळ यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘सेवा संवाद’ आणि ‘डिजी संवाद’ सारखे महत्त्वाचे उपक्रम कार्यान्वित केले आहेत. १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या ‘सेवा संवाद’ या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८७३ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या कामकाजात मोठी शिस्त आली आहे. प्रत्येक केंद्रावर उपलब्ध असलेल्या QR-Code मुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा, सरकारी दरपत्रकाची अचूकता आणि केंद्र चालकाचे वर्तन यावर थेट ऑनलाईन अभिप्राय देण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या रेटिंग प्रणालीमुळे केंद्र चालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली असून, अतिरिक्त शुल्काच्या तक्रारींवरही प्रभावी नियंत्रण आले आहे. त्याचबरोबर, नागरिकांना तक्रार निवारणासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी ‘डिजी संवाद’ या WhatsApp आधारित (९९३०००११८५) उपक्रमाद्वारे २४x७ तक्रार नोंदणीची सुविधा दिली गेली आहे. घरबसल्या केवळ एका मेसेजद्वारे तक्रार नोंदवणे आणि तिचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य झाल्याने प्रशासन खऱ्या अर्थाने गतिमान झाले आहे.केवळ दैनंदिन कामकाजातच नव्हे, तर ऐतिहासिक वारसा जतन करण्यातही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दूरदृष्टी दाखवली आहे. ‘ई-संजीवन’ प्रणालीच्या माध्यमातून १८९० पासूनची जन्म-मृत्यू नोंदणीची जुनी ‘कोतवाल रजिस्टर्स’ आता AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित करण्यात आली आहेत. यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या नोंदी शोधणे आता काही सेकंदांचे काम झाले आहे. तसेच, ‘राजभूमी’ पोर्टलच्या माध्यमातून शासकीय जमिनींचे डिजिटल व्यवस्थापन सुरू करून प्रशासनाने भू-माफियांवर मोठा वचक बसवला आहे. अक्षांश-रेखांश आणि जिओ-रेफरन्सिंगमुळे सरकारी जमिनींचे अचूक क्षेत्र निश्चित झाले असून, ‘लँड बँक’ सुविधेमुळे विकास प्रकल्पांसाठी जागा निवडणे आता अधिक सुलभ झाले आहे. या पोर्टलवरील ‘Street View’ आणि विविध GIS लेयर्समुळे अतिक्रमणे शोधणे आणि जमिनींचे संरक्षण करणे सोपे झाले असून हे भू-व्यवस्थापनातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचेही डिजिटल मॅपिंग डॉ. पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय शाळा आणि आपत्कालीन सेवांची माहिती नकाशावर उपलब्ध केल्यामुळे सामान्य नागरिकांना या सेवा शोधणे सुलभ झाले आहे. मुख्य रस्त्यांचे जाळे आणि ड्रेनेज व्यवस्थेची डिजिटल माहिती उपलब्ध असल्याने भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूरनियोजन अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करणे शक्य झाले आहे. अतिदुर्गम शहापूर-मुरबाडपासून ते गजबजलेल्या ठाणे-कल्याणपर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद ठरले आहे. ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या या मूलभूत परिवर्तनासाठी आज एका विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी आणि नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आणि समस्त ठाणेकरांसाठी अभिमानास्पद असून, डॉ.पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी कार्यान्वित झालेल्या या डिजिटल अध्यायाने प्रशासकीय उत्तरदायित्वाचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

‘मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना आदरांजली

‘मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना आदरांजली विश्वास सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम ठाणे: स्वरांचा शिलेदार पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गायकीतील ठुमरी, होरी, नाट्यसंगीत, अभंग, भैरवीतील नजाकतीचे स्मरण करीत पार पडलेल्या `मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी पुढाकार घेत विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात `मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन केले होते. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आशा खाडिलकऱ कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, प्रसिद्ध गायक व कारेकरबुवांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सुरेश बापट, अमित प्रभाकर कारेकर, संजय वाघुले, भाजपाचे महापालिकेतील गटनेते मुकेश मोकाशी, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमित वाघचौरे, पदाधिकारी वृषाली वाघुले-भोसले यांनी दीपप्रज्वलन केले. पंडित सुरेश बापट यांनी `मर्मबंधातील ठेव’ या नाट्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर `धन्य आनंद दिन’ पूर्ण हे नाट्यपद, `राम होऊनि राम गा रे’ हे भक्तीगीत, `बोलावा विठ्ठल’ हा अभंग, `या कागदी फुलांच्या’ भावगीताने मैफल रंगत गेली. प्रत्येक कलाकाराच्या गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारेकर बुवांनी स्वत:ची गायकी घडविली. सुरुवातीला त्यांचा पातळ गळा होता. मात्र, त्यांनी रियाझाने दमदार बनविला होता. एका मैफिलीसाठी अष्टपैलू व्यक्तिमत्व पु. ल.देशपांडे यांनी कारेकरबुवांना प्रिये पहा हे नाट्यपद शिकविले होते. अन्, त्या मैफिलीनंतर प्रभाकर कारेकर नावाचा उष:काल घडला, अशी आठवण निवेदिका अनघा मोडक यांनी सांगितली. `प्रिये पहा,रात्रीचा समय सरुनी’ या नाट्यगीताने पं. सुरेश बापट यांनी मैफिलीला उंचीवर नेले. चंदनाचे परिमळ, दिनांची माऊली, गगना गंध आला, माझ्या देहाची पालखी या गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पंडित सुरेश बापट यांनी अजरामर झालेल्या `मै कही समझाऊं सब जग अंधा’ या भैरवीने रसिकांना मंत्रमुग्ध केलेल्या या मैफिलीचा समारोप केला. तत्पूर्वी कारेकरबुवा व प्रसिद्ध नाटककार सतीश दुभाषी यांच्या अखेरच्या भेटीचा किस्सा पंडित सुरेश बापट यांनी सांगितला. शिवाजी मंदिर येथे झालेल्या जून १९८० मधील प्रयोगावेळी अष्टपैलू अभिनेते सतीश दुभाषी यांनी `मै केही समझाऊं’ ही भैरवी ऐकली. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी कारेकर बुवांची भेट घेतली. पुन्हा कधी ही भैरवी ऐकेल माहित नाही, असे म्हणून दोन मिनिटे भैरवी सादर करण्याची विनंती केली. कारेकर बुवांनी सर्व वाद्यांसह संपूर्ण भैरवी सादर केली. दुर्दैवाने त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सतीश दुभाषींचे अचानक निधन झाले होते. त्यावेळी एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली दाद आम्ही अनुभवली होती, या आठवणीने रसिक गहिवरून गेले. पंडित सुरेश बापट यांच्याबरोबरच गायक श्रीरंग भावे, ओंकार प्रभुघाटे, केतकी भावे जोशी, गोव्यातील संदेश खेडेकर यांनी कारेकर बुवांना सांगीतिक मानवंदना दिली. नीला सोहनी, हर्षल काटदरे, सुहास चितळे, गणेश मेस्त्री, धनंजय पुराणिक आणि श्रेयस व्यास या प्रतिथयश वादकांनी समर्पक साथ दिली. तर अनघा मोडक यांनी निवेदनाची धुरा सांभाळली.