विजय वैद्य यांच्या नावाचा पहिला पुरस्कार संजय डहाळे यांना

मुंबई : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेल्या विजय वैद्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची तसेच जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विजय वैद्य यांच्या नावाचा पहिला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दैनिक सामना मध्ये प्रारंभापासून सुमारे तीस वर्षे उच्च पदावर निष्ठापूर्वक जबाबदारी पार पाडणारे ज्येष्ठ पत्रकार संजय डहाळे यांना देण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शारदा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळविलेले दिलीप ठाकूर यांना, प्रेरणा पुरस्कार वायंगणकर साई स्पोर्ट्स च्या आधारस्तंभ पल्लवी राकेश वायंगणकर यांना तसेच जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय पडकील यांना देण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला येत्या २४, २५ आणि २६ एप्रिल २०२६ असे तीन दिवस आयोजित करण्यात आली असून या वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी साडेसात वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. रसिक श्रोत्यांनी या बौद्धिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *