अनिल ठाणेकर
ठाणे : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर बांधलेली असल्याने तिथे ‘आत्मे’ दिसतात आणि त्यामुळे पालिका कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण असून काम करणे कठीण जात आहे, असा अत्यंत अविवेकी, अवैज्ञानिक, धक्कादायक दावा महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
ज्या सामाजिक न्याय विभागाने भारतात पहिला असा जादूटोणा विरोधी कायदा पारित करून घेतला, त्याच विभागाचे मंत्री त्याच कायद्याची मूल्ये पायदळी तुडवणारी, लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढवणारी, भय निर्माण करणारी विधाने करतात हे देशातील प्रगत मानल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्याचा आणि संत-समाज सुधारकांचा अवमान करणारे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.
जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे खीळ बसू शकते. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. म्हणून महा. अंनिस त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. आम्ही आवाहन करीत आहोत की महापालिकेची ही कथित आत्म्यांचे वास्तव्य असलेली इमारत या मंत्र्यांना काम करण्यायोग्य वाटत नसेल तर ती पाडण्याऐवजी आमच्या समितीकडे हस्तांतरित करावी. आम्ही त्या जागेत व्यवस्थित सामाजिक कामे करून, विविध उपक्रम करून दाखवू.छत्रपती संभाजीनगर महापालिकेबाबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेले विधान हे पूर्णपणे अविवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळ फासणारे आहे. मानवी मेंदू भीती, अज्ञान आणि अफवांच्या प्रभावाखाली अनेक गोष्टींची कल्पना करतो. अंधार, एकटेपणा, मानसिक ताण किंवा पूर्वग्रह यांच्या परिणामामुळे लोकांना “काहीतरी आहे” असे वाटू शकते. पण त्या अनुभवांचा अर्थ अलौकिक शक्ती असा होत नाही.महापालिकेसारख्या सार्वजनिक संस्थांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे जबाबदार लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. यामुळे समाजात भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धा वाढीस लागते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्पष्ट मतप्रवाह असा आहे की—कोणतीही घटना तर्क, विज्ञान आणि पुराव्यांच्या आधारे समजून घेतली पाहिजे,भूत-प्रेत, आत्मा यांसारख्या संकल्पना या मानवनिर्मित आहेत, वास्तव नाहीत,समाजाने अंधश्रद्धेऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे, महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा हा सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने २०१३ ला मंजूर झाला असून त्या कायद्याअंतर्गत हजारो भोंदू बुवाबाबा ,मांत्रिक यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे, काहींना या गुन्ह्यात शिक्षा झाल्या आहेत.त्याचा मंत्रालयाचा मंत्री असे अवैज्ञानिक दावे करतात,याचा आम्ही निषेध करतो,मंत्री संजय शिरसाट यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा द्यावा.अशा अवैज्ञानिक,अतार्किक विधाने करणाऱ्यांनी पुरोगामी महाराष्ट्र मागे खेचत आहेत. संविधानिक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने विधाने करावीत. अशा भीती पसरवणाऱ्या कल्पनांपासून दूर राहूया, आणि विवेक, विज्ञान व सत्याच्या बाजूने ठाम उभे राहूया.विवेकी समाज बनण्याच्या प्रक्रियेमध्ये अशी विधाने समाजाला घातक ठरतात, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
