
अनिल ठाणेकर
ठाणे : महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधकी वारसा माणूसपण राखणारा, चिकित्सा करणारा आहे. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पर्यायी समाज व्यवस्था फुले यांनी उभी केली. अंधश्रद्धा, बुवाबाजीमुक्त समाज करण्याचे काम अंनिस करीत आहे. अंनिसने दोन हजार हून अधिक सत्यशोधक विवाह लावले आहेत जात,धर्म,लिंग भेदाला विरोध करण्याचा विचार जोतीराव यांनी दिला.सत्यशोधक परिषदेचा उद्देश, महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेले वैचारिक मूल्यांचा वारसा पुढे शाहू महाराजांनी तदनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नंतर हल्लीच्या काळात दि बा पाटील व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे नेला त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की तो वैचारिक वारसा पुढे न्यायचा. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊन ते कार्य पुढे न्यावे. असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले जन्मद्विशताब्दी वर्षाचा आरंभ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे आंदोलनाचे शंभरावे वर्ष आणि लोकनेते दि बा पाटील यांची जन्मशताब्दीचे वर्ष या प्रसंगांचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कोकण विभागीय सत्याशोधक परिषदेचे आयोजन १२ एप्रिल रोजी के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लौकीकाप्रमाणे वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. तुकाराम महाराज यांच्या गाथेच्या आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पुस्तकांच्या प्रतिकृती एकेका प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एकावर एक रचून आणि त्यावर हाताचे मॉडेल आणि त्यावर सत्यशोधन करणाऱ्या मेंदूची प्रतिकृती असा तुकारामांच्या गाथेवर उभारलेला एक छोटासा अर्थपूर्ण मनोरा तयार करण्यात आला. मुंबई नवी मुंबई ठाणे व रत्नागिरी सह कोकण विभागातील अन्य जिल्ह्यांमधून आलेल्या जवळपास २५० कार्यकर्त्यांनी आणि विविध समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अनोख्या उद्घाटनाचे कौतुक केले. याप्रसंगी उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे उपस्थित होते. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी याही आवर्जून उपस्थित होत्या. या सत्राचे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मासिकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड हे होते. खासदार सुरेश म्हात्रे यांनी या उपक्रमाचे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचे कौतुक केले. श्रद्धा असली तरी अंधश्रद्धा आणि त्यातून होणारे शोषण अजिबात असू नये असे मत त्यांनी मांडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठीमागे आपण उभे असून समितीच्या कार्यासाठी सर्व प्रकारे मदत करण्याचे तसेच गरज असेल तेव्हा संसदेत अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रश्न मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगतले. सुरेखा दळवी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिबा पाटील यांच्या कार्याविषयी विवेचन केले. सध्याच्या परिस्थितीत समाज कुंठित अवस्थेत गेलेला असून आता काय करावे असा प्रश्न पडला आहे अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच हल्ली समाजाला प्रतिकांमध्ये अडकवून सांस्कृतिक विषमता आणण्याचे काम सुरू आहे असा इशारा त्यांनी दिला. सगळीकडे अंधार दाटलेला असल्यामुळे, पणती जपून ठेवा अंधार फार झाला… ही कवितेची ओळ लक्षात ठेवून अंधार वाढू देऊ नका असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. “सत्यशोधक विचार व अंनिस” या चर्चासत्रात सुशीला मुंडे यांनी महात्मा फुले यांच्या वेगवेगळ्या अखंडांचा दाखला देऊन फुले यांचे विचार संविधानात आल्याचे आणि अंनिस त्यानुसारच कसे कार्य करते याचे तपशीलवार विवेचन केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात उत्तम जोगदंड यांनी महात्मा फुले यांचे हे वेगवेगळे अखंड उद्धृत करून महात्मा फुले यांनी त्यांच्या काळातील अफवांचे आणि त्यातून होणार्या अन्याय अत्याचारांचे फॅक्ट चेक करून या व्यवस्थेचा भांडाफोड केल्याचे सांगितले. तसेच महात्मा फुले यांनी त्याची संपूर्ण कारण मिमांसा करून दलितांना आणि बहुजनांना शिक्षणाचा मार्ग कसा दाखवला याबाबत विवेचन केले. तसेच त्यांनी सुरेखा दळवी यांच्या भाषणाचा आढावा घेतला. “जोतिबा ते दि बा- वारसा सत्यशोधनाचा” हा दुसऱ्या सत्राचा विषय होता. प्रमुख वक्त्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर तसेच शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड रोशन पाटील. या सत्राचे अध्यक्ष होते ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे. या परिसंवादात ॲड. रोशन पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान, यांनी शिवरायांची उपेक्षित ठेवली गेलेली समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली असल्याचे सांगून त्यांनी शिवराय हे रयतेचे राजे कसे होते, त्यांचा वैचारिक वारसा महात्मा फुले यांनी आणि नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर, दि बा पाटील व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे कसा चालवला, त्यांना या त्यांच्या कार्यात कसे अडथळे आणले गेले याची माहिती दिली. रेखा ठाकूर यांनी महात्मा फुले यांच्या अखंडांचा उल्लेख करून त्याचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाताना शिक्षणावर भर देणे किती गरजेचे आहे या बाबत आपले विचार मांडले.अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांनी परिसंवादात ज्यांनी विचार व्यक्त केले त्यांच्या भाषणांचा थोडक्यात आढावा घेतला आणि वर्तमान परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल करणे किती आवश्यक आहे यावर विवेचन केले.
0000
