श्री मावळी मंडळ कबड्डी स्पर्धा
ठाणे :- होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ यांनी पुरुषांत, तर स्नेहविकास, ओम् वर्तकनगर, नवशक्ती यांनी महिलात श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” आपली आगेकूच सुरु ठेवली. पुरुष गटात डॉन बास्कोचा जीत सिंग, तर महिला गटात एस. आय. ई. एस. ची आस्था सिंग दुसऱ्या दिवसांतील उत्कृष्ट खेळाडू ठरले.
ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पुरुष गटात ठाण्याच्या होतकरू मंडळाने उपनगरच्या केदारनाथ मंडळावर २८-१९ अशी मात केली. पूर्वार्धात ०९-१० अशा पिछाडीवर पडलेल्या होतकारूने उत्तरार्धात आपला खेळ गतिमान केला आणि लोण देत सामना आपल्या बाजूने झुकविला. मितेश चव्हाण याच्या चढाया, तर तुषार यादव, देवेन पाटील यांचा भक्कम बचावला विजयाचे श्रेय जाते. केदारनाथच्या ओमकार कदम, ओम् कदम यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला.
मिडलाईन स्पोर्टस् ने अभिषेक भोईर, धीरज बैलमारे, अजित चव्हाण यांच्या चतुरस्त्र खेळाने अष्टविनायक संघाला आरामात पराभुत केले. अष्टविनायकचे स्वयंम गोंधळे, सागर भोईर चमकले. जय भवानी तरुण मंडळाने चिंतामणी स्पोर्टस् ला ३४-२५ असे पराभूत केले ते तुळशीदास शिर्के, कुणाल शिंदे, ऋषिकेश पवार यांच्या चढाई ,पकडीच्या शानदार खेळामुळे. . चिंतामणीचे हर्षल शहा, विशाल सणस उत्तम खेळले. बालगोपाळ मित्र मंडळाने ओवळी मंडळावर रंगतदार लढतीत ३४-३१ असा विजय मिळविला. पहिल्या डावात चूरशीची लढत झाल्यामुळे मध्यंतरला गुणफलक १४-१४ अशा बरोबरीत होता. मध्यंतर नंतर बाळ गोपाळच्या फाजल नाडर, राज चौधरी, अतिश जीत यांनी आपला खेळ उंचावत संघाला निसटता विजय मिळवून दिला. ओवळीच्या महेश कदम, प्रिन्स यादव, चिराग सिंग यांची लढत एकाकी ठरली.
महिला गटात उपनगरच्या स्नेहविकास मंडळाने ठाण्याच्या अश्वमेघ स्पोर्टस् ला २६-२५ असे चकविले. विश्रांतीला लोण देत १४-०९ अशी आघाडी घेणाऱ्या स्नेहविकासला नंतर मात्र अस्वमेघ संघाने कडवी लढत दिली. प्राची तावडे, रिया तावडे, प्रांजल जाधव स्नेहविकास कडून, तर वैष्णवी चव्हाण अश्वमेघ संघाडून उत्कृष्ट खेळल्या.. ओम् वर्तकनगर संघाने वैष्णवी साळुंखे, पूजा जाधव, पूर्वा इंगवले यांच्या तुफानी खेळाने उपनगरच्या सत्यम सेवा संघाला सहज नमविले. मुंबई शहरच्या अमरहिंदने ठाण्याच्या छत्रपती शिवाजी मंडळावर दणदणीत विजय मिळवला. छत्रपतीच्या तारा देसाई, रेखा गुप्ता चमकल्या.
इतर निकाल :
पुरुष :
१)सत्यम सेवा वि. वि. स्व. रतन पाटील मंडळ ४१-१७,
२)श्री समर्थ- कलवार वि. वि. श्री स्वामी समर्थ ३६-१७,
३)विवेक स्मृती वि. वि. विजय क्रीडा ३३-१६,
४)गावादेवी-जाभूळ वि. वि. सन्मित्र उपनगर ४६-१०.
महिला :
१) नवशक्ती स्पोर्टस् वि. वि. किल्ले माऊली ३४-१७,
२) विवेक स्पोर्टस् वि. वि. डॉ. शिरोडकर मुंबई ५२-१८.
000000
