श्री मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
ठाणे :- श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” ओम् वर्तकनगरने महिला विभागात चौथी फेरी गाठली.तर पुरुष गटात शिवमुद्रा प्रतिष्ठान, श्रीराम विश्वस्त, जय बजरंग-वाशिंद, मिड लाईन यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला.
अश्वमेघ संघाला मात्र चौथी फेरी गाठण्यासाठी ५-५ चढाईच्या डावापर्यंत लढत द्यावी लागली.ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या दिवशी पुरुष गटात ठाण्याच्या अश्वमेघ संघाने ५-५ चढायात बाळ गोपाळ मंडळाचा प्रतिकार ३३-३२(७-६) असा मोडून काढत आगेकूच केली. पूर्वार्धात १३-१५ अशा पिछाडीवर पडलेल्या अश्वमेघने पूर्ण डावात २६-२६ अशी बरोबरी साधली. नंतर ५-५ चढायात ७-६ अशी बाजी मारली. अश्वमेघच्या आदित्य पांडेने ५-५ चढयातील आपल्या २ऱ्या चढाईत ३ गडी टिपत संघाचा विजय निश्चित केला. त्याला गणेश रणनवरे, हर्षल शिंदे, शुभम पांडे यांची उत्तम साथ लाभली. बाळ गोपाळच्या पंकज फाटक, अमित शहा, दिपू तिवारी यांचा जोश ५-५ चढाईत किंचितसा कमी पडला. शिवमुद्रा प्रतिष्ठानने मध्यंतरातील १६-१७ अशा पिछाडीवरुन गुड मॉर्निग स्पोर्टस् चा संघर्ष ३७-२७ असा संपविला. विशाल लाड, राकेश घाडी, अनिकेत सोनुले यांच्या चढाई पकडीच्या खेळाने शिवमुद्राने हा विजय साकारला. सुरज दळवी, आयुष पवार यांचा खेळ उत्तरार्धात ढेपळला.
श्रीराम विश्वस्त संघाने पहिल्या डावातील १६-२३ अशा ७ गुणांच्या पिछाडीवरुन श्री विठ्ठल मंडळाचे आवाहान ४१-३८ असे संपुष्टात आणले . अक्षय मकवाना, चिन्मय गुरव, सिद्धेश पाणीचाळ यांच्या चतुरस्त्र खेळाने पहिल्या डावात श्री विठ्ठल संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण ती त्यांना टिकविता आली नाही. श्रीरामच्या तुषार शिंदे, हर्ष काळे, आदित्य पात यांनी टॉप गिअर टाकत विरुद्ध संघावर २ लोण देत ३गुणांनी बाजी पालटविली. जय बजरंग- वाशिंद संघाने वीर परशुराम संघावर २८-२१ अशी मात केली. विराज शिंदे, आशिष पाटील यांच्या चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते.
महिलांत ओम् वर्तकनगरने अमर हिंद मंडळाला ४२-२४ अशी मात करीत चौथी फेरी गाठली. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात २ लोण देत २४-०७ अशी आघाडी घेणाऱ्या वर्तकनगरने उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ओम् वर्तकनगरच्या वैष्णवी साळुंखे, पूजा जाधव, पूर्वा इंगवले यांच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अमर हिंदची साईशा पेडणेकर चमकली.
या अगोदर दुसऱ्या फेरीच्या झालेल्या सामन्यात जय भारत स्पोर्टस् ने स्फूर्ती सेवाला ३८-३४ असे चकवीत तिसरी फेरी गाठली. जय भारतच्या श्रेया गावंड, समृद्धी महागडे, परी घडशी यांच्या उत्कृष्ट खेळाने विजयी किमया साधली. स्फूर्तीच्या दीपाली बागडे, नूतन चव्हाण, शामली यांनी कडवी लढत दिली.
यासिका पुजारी, मनीषा चौगुले, प्रतिक्षा तांडेल यांच्या नेत्रदीपक खेळाच्या जोरावर स्वराज्य स्पोर्टस् ने रा. फ. नाईक संघावर ३३-१५ अशी मात केली. रा. फ. ची रेखा चिकणे एकाकी लढली. मिडलाईन अकादमीने संघर्ष संस्थेला ३१-१८ असे सहज नमवून आपली घोडदौड सुरूच ठेवली. मोक्ष पुजारी, श्रावणी हांडे, सिद्धी बलकवडे मिडलाईन कडून तर प्रतिक्षा मारका, भूमिका भारती संघर्ष कडून उत्तम खेळल्या.
