पोलिसांनी आश्वस्त केल्याने पीडितांकडून प्रतिसाद
हरिभाऊ लाखे
नाशिक –हाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक माहती पुढे येत आहे. विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तसेच खरातच्या आर्थिक व्यवहारांचा ईडीकडून तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खरातविरुध्द तक्रारी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पीडिता पुढे येत असल्याने खरातच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होणार आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात लैंगिक शोषणासह फसवणुकीचे अशोक खरातविरुध्द १५ गुन्हे दाखल आहेत. यातील महिला लैंगिक अत्याचाराचे आठ आणि फसवणुकीचा एक अशा नऊ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात आहे. महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या चौथ्या गुन्ह्यात खरातची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. संशयिताचा पोलीस कोठडीचा हक्क राखून १४ दिवस न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली.
या गुन्ह्यात न्यायालयाने खरातला ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.विशेष तपास पथकाने लैंगिक अत्याचार व जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये दाखल पाचव्या गुन्ह्यात खरातचा सहभाग उघड झाल्याची माहिती दिली. या गुन्ह्याच्या तपासासाठी संशयिताचा ताबा मिळावा यासाठी सादर केलेला अर्ज न्यायालयाने मान्य केला आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी अर्थात कारागृहात रवानगी झाल्यानंतर खरातला लगेच पुढील अटक करून पोलीस कोठडीत घेतले जाते. आतापर्यंतच्या चार गुन्ह्यात खरातला १४ ते पाच दिवसांपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.
खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर प्रारंभी काही व्हिडिओ समाज माध्यमात आल्याने पीडितांमध्ये बदनामी होण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. पोलिसांनी पीडितांमध्ये असलेली भीती हेरुन त्यांना विश्वासात घेण्याचे काम केले. त्यांची ओळख कोणत्याही प्रकारे बाहेर येणार नसल्याचे आश्वासित केल्यानंतर महिलांना धीर आला. आणि त्या अशोक खरातविरुध्द तक्रार देण्यासाठी पुढे येऊ लागला. तक्रारींचा ओघ आता चांगलाच वाढला असून विशेष हेल्पलाईनवर दिवसातून खरातविरुध्द तक्रारीचे पाच ते सहा कॉल येत आहेत.
२० पेक्षा अधिक दिवसात शेकडो तक्रारी आल्याची माहिती पुढे येत आहे. तक्रारींमध्ये लैंगिक शोषणासह फसवणूक, आर्थिक व्यवहारात लबाडी, दमदाटी यासारख्या तक्रारींचा समावेश आहे. अशोक खरातविरुध्द आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी आठ गुन्हे महिलांवरील लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. हेल्पलाईनवर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत ४० जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवले आहेत. खरातविरुध्द महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती अधिक आक्रमक झाली असून खरातला अधिकाधिक शिक्षा कशी होईल, हे पाहावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
