अलिशान घरातून ६ कोटींचे ड्रग्ज जप्त, घरातून चालवत होती रॅकेट

कल्याण : नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अंमली पदार्थविरोधी विभागाने साकीनाक्यातून जप्त केलेल्या दोनशे एक्स्टेंसी गोळ्यांचे टिटवाळा कनेक्शन उघड झालं आहे. त्यानंतर टिटवाळाच्या हायप्रोफाइल सोसायटीत राहणाऱ्या अश्विनी पॉल या महिलेच्या घरी छापा टाकण्यात आला. तिच्या घरातून ६ कोटींच्या ५ हजार एक्स्टेंसी गोळ्या जप्त करुन तिला अटक करण्यात आली आहे.
नेस्को प्रकरण उजेडात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल ढोले आणि पथकाने साकीनाका येथे छापा घालून २०० एक्स्टेंसी गोळ्या जप्त केल्या. हा साठा बाळगणाऱ्या इरफान अन्सारीला अटक केली. त्याच्या चौकशीतून पॉलचे नाव समोर आले. पॉल पूर्वी कल्याण येथे राहण्यास होती. दोन महिन्यांपूर्वीच ती टिटवाळा येथे शिफ्ट झाली होती.
पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सलग तीन दिवस तांत्रिक पुराव्याच्या आधारे तिचा शोध सुरू केला. पथक तिच्या टिटवाळा येथील कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचले. त्यात तिचे घर शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यातून तिचा शोध घेत शनिवारी रात्री पथकाने घरी छापा टाकला. दरम्यान, तिच्या घरातून ६ कोटी किमतीच्या ५ हजार एक्स्टेंसी गोळ्या मिळून आल्याने पोलिसही चक्रावले. पोलिस आपल्यापर्यंत पोहचतील, असे तिला वाटले नव्हते. त्यामुळे ती बिनधास्त होती. पोलिसांनी इरफाननंतर सुफियान नावाच्या आरोपीला अटक केली. तो पॉल आणि इरफानमधला दुवा होता. पुढे सुफियानमुळे पोलिस पॉलपर्यंत पोहोचले.
पॉल पूर्वी डान्स बारमध्ये काम करायची. तेथून बाहेर पडल्यानंतर ती ड्रग्ज सप्लायर बनल्याची माहिती आहे. तिची दोन लग्नं झाली आहेत. तिचा एक पती गुन्हेगार असून, तिची हिस्ट्री पोलिसांकडून काढण्यात येत आहे. पॉलकडून ४ ते ५ फोन आणि ७ ते ८ सीमकार्ड जप्त केली. पार्टी ड्रग्जच्या सप्लायसाठी ती या वेगवेगळ्या क्रमांकाचा तात्पुरत्या स्वरुपात वापर करत होती. तिच्या फोनमधून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीज, डॉलरसह वेगवेगळी चिन्हे, अक्षरे कोरलेली आहेत.
यापूर्वी नेस्को ड्रग्ज पार्टीमध्ये जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीजचे चिन्ह होते. तर वरळी पोलिसांनी जप्त केलेल्या गोळ्यांवर ऑडीचे चिन्ह होते. इरफानला अटक झाल्याबाबत पॉलला कल्पना नव्हती. पोलिस तिच्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीत, या विचाराने तिने एवढा साठा घरातच ठेवला. टिटवाळ्याच्या हायप्रोफाईल सोसायटीत राहणारी ‘ती’ मुंबईत ड्रग्ज जाळे पसरवत होती. डान्स बारमधून गुन्हेगारीच्या जगात आलेल्या या महिलेने घरातच ६ कोटींचा साठा दडवून ठेवला होता. पोलिसांनी धाडसी कारवाई करत तिचा हा बेबनाव उघड केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *