ठाण्यात भाजपच्या नगरसेवकांचा संताप, भरत चव्हाण यांची तहकूबीची मागणी

ठाणे: संसद व राज्याच्या विधानसभांमध्ये `नारी शक्ती वंदन अधिनियम’ विधेयक मंजूर न करणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्थ ठाणे महापालिकेची महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांची मागणी महापौर व प्रशासनाने नाकारल्यानंतर, उपमहापौर कृष्णा पाटील व गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह भाजपाच्या नगरसेवक-नगरसेविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यापुढील महासभेत पुन्हा हा विषय मांडण्याचा भाजपने निर्धार केला असल्याचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले.
`नारी शक्ती वंदन अधिनियमा’ला विरोध करीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या केली. महिला आरक्षणाला विरोध करण्यातून विरोधी पक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे, याकडे लक्ष वेधत नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापौर व महापालिका सचिव यांना आजची महासभा काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्ह दिवसभरासाठी तहकूब करावी, अशी मागणी केली. मात्र, या मागणीचे पत्र महापौर व महापालिका सचिवांकडून स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर घोषणा देत निषेध केला. या आंदोलनात उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, काजोल गुणिजन, उषा वाघ, वेदिका पाटील, माधुरी मेटांगे, अनिता भोईर यांच्यासह नगरसेविका सहभागी झाल्या होत्या.
नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून संसद व विधानसभेत महिलांना जादा प्रतिनिधीत्व मिळाले असते. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षांकडून विधेयक नामंजूर केले. देशातील ७० कोटींहून अधिक महिलांचा हा अपमान होता, असे भरत चव्हाण यांनी सांगितले. या विषयावर सभा तहकूबीची मागणी भरत चव्हाण यांनी केली होती. तर नगरसेविका नंदा पाटील यांनी अनुमोदन दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *