भाजपच्या विरोधात काँग्रेस “पोलखोल मोहीम” राबवणार

ठाणे (सिद्धेश शिगवण):-

सध्या देशभरात महिला आरक्षणाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजत असल्याचं पाहायला मिळतंय. महिला आरक्षण मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस सातत्याने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहे. याच अनुषंगाने आज ठाण्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य आरिफ नसीम खान यांनी  पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टी सरकारवर जोरदार टीका केली.

आरिफ नसीम खान यांनी आरोप केला की, महिलांसंदर्भातील विधेयक नामंजूर करण्यात भाजपचाच हात असून “खोटं बोला, रेटून बोला” अशी भूमिका केंद्रातील सरकारची असल्याचे ते म्हणाले. महिलांना आरक्षण देण्याच्या नावाखाली डिलिमिटेशनचा अडसर निर्माण करून भाजपने महिलांचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, महिलांसाठी विशेष अधिवेशन आयोजित करूनही प्रत्यक्षात महिलांचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला.

“हे महिला आरक्षण विधेयक नसून कायदा संशोधन विधेयक आहे,” असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, 2023 मध्ये 33 टक्के महिला आरक्षणाला काँग्रेस सहमत होती; मात्र या प्रक्रियेमुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनी याला विरोध केला. “2023 च्या 33 टक्के आरक्षणाला मोदी सरकारने थेट सहमती द्यावी. मात्र आरक्षणाच्या नावाखाली संविधानाची गळचेपी आम्ही सहन करणार नाही,” असेही खान यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे आरोप केला की, कायदा संशोधनाच्या माध्यमातून “चोर दरवाज्याने” संविधानात बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे देशातील समतोल आणि प्रगतिशील विचारसरणी धोक्यात येईल.

यावेळी त्यांनी नमूद केले की, 2023 मध्ये सोनिया गांधी यांच्या मागणीमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आला होता, तर राहुल गांधी यांनीही जातीनिहाय जनगणनेसाठी सातत्याने भूमिका मांडली आहे. “महिला आणि मागासवर्गीय समाजांना काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. मात्र या निर्णयाच्या नावाखाली संविधानाची हत्या आम्ही होऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी भाजपवर दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप केला.

भाजपवर टीका करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “भाजपमध्ये महिला राज्याध्यक्ष का होत नाहीत?” तसेच, महिला सक्षमीकरणाचा दावा करणाऱ्या पक्षाच्या काही नेत्यांवर महिलांवरील अत्याचाराचे आरोप असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, काँग्रेस पक्ष लवकरच भाजपच्या धोरणांविरोधात “पोलखोल मोहीम” राबवणार असल्याची माहितीही आरिफ नसीम खान यांनी दिली.

000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *