आज जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा
उल्हासनगर दि 20(सुनिल इंगळे ):- उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती तसेच नऊ विशेष समितींच्या सभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व पदांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. आज या प्रक्रियेला अधिकृत शिक्कामोर्तब मिळाले असून ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी महापालिका सभागृहात सर्व सभापतींची घोषणा जाहीर केली.
उल्हासनगर महापालिकेच्या विविध समित्यांसाठी सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज पाच दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक न लागता सर्व पदे बिनविरोध निवड निश्चित झाली होती. स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना नगरसेवक कुलवंत सिंग सोहता याची निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी साई पक्षाच्या दीप्ती दुधानी, नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी भाजपच्या मीना कौर अजित सिंग लबाना, पाणी पुरवठा व जलनिसारण समिती सभापती पदासाठी भाजपच्या दीपा नारायण पंजाबी, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या सविता तोरणे, माध्यमिक व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या साक्षी सुर्वे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती पदासाठी भाजपच्या विपुल मयेकर, क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी भाजपच्या प्रीती विनोद मखिजा, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या मीना दीपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या प्रेरणा अजित मखिजानी यांची निवड घोषित करण्यात आली.
सोमवारी झालेल्या अधिकृत घोषणेनंतर संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर,माजी आमदार पप्पू कालानी, महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, गटनेता अरुण आशान,शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया यांच्या मार्फत अभिनंदन करण्यात आले. यावेळी महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
