३२ बनावट खाती उघडून ५७ लाखांचा गंडा, सिन्नरमध्ये गुन्हा दाखल!

हरिभाऊ लाखे

नाशिक : अशोक खरातची वेगवेगळी गैरकृत्ये उघड होत असून त्याच्याविरुध्द सिन्नर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराला ५७ लाख ९० हजार ९७९ रुपयांना फसविण्यात आल्याप्रकरणी खरातसह श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक, संबंधित कामकाज पाहणारे कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

खरातवर महिलांचे लैंगिक शोषण, खंडणी, जमीन बळकावणे, फसवणूक असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यात सिन्नर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सिन्नर परिसरातील श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कुंदेवाडी या ठिकाणी तक्रारदार आणि इतर साक्षीदार अशा ३२ लोकांची बनावट खाती उघडण्यात आली. पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी यांनी खाते उघडताना आवश्यक कागदपत्रांची पाहणी, जमवाजमव केली नाही. खाते उघडण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच इतर दोन ओळखीच्या लोकांची शिफारस आवश्यक असतांनाही कुठलीही पूर्तता झालेली नाही. योग्य ती कारवाई न करता पतसंस्थेच्या वतीने तक्रारदाराचे खाते उघडत त्या खात्यात १० ऑगस्ट २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ५७ लाख ९० हजार ९७९ रुपयांचा गैरव्यवहार तक्रारदाराच्या संमतीशिवाय झाला.

या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात खरात याच्यासह पतसंस्थेचे व्यवस्थापक, संचालक, कर्मचारी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार आणि खरातची ओळख नव्हती. त्याचे नावे खाते कसे उघडले गेले, पैसे कोणत्या खात्यातुन फिरले, याची माहिती पोलीस घेत आहेत. शिर्डी येथे दाखल गुन्ह्याचा तपास करत असतांना सिन्नर हद्दीतील श्री जगदंबा पतसंस्थेचे नाव पुढे आले. या अनुषंगाने या एकुणच आर्थिक व्यवहाराचा चौकशी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *