कल्याण- सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन, तत्काळ सभासद योजना व एक कविता तळ्याकाठी या कार्यक्रमाचे आयोजन प्रबोधनकार ठाकरे सरोवर कल्याण (प) या ऐतिहासिक ठिकाणी करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याहस्ते पुस्तकगुढीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उदेशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून तत्काळ सभासद योजनेत जास्तीत जास्त वाचकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केले. वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी डिजिटल युगात ई – बुक्स व ऑडीओबुक्स उपलब्ध असले तरी हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद वेगळाचा असतो असे मत व्यक्त केले.
प्रात: काळी फेरफटका मारण्याकरिता येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारचे ग्रंथ एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळाली असल्याचे आनंद नागरिकांनी व्यक्त केला. वाचनालयाच्यावतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने सदर पुस्तक प्रदर्शनामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळेल असे मत वाचनालयाच्या वाचक सभासदांनी मांडले. “एक कविता तळ्याकाठी” या उपक्रमांतर्गत तळ्याकाठच्या शांततेचा व निसर्गाच्या सौदर्याचा अनुभव घेत कवी मकरंद वांगणेकर, सुधाकर कांबळी, सिने नाट्य अभिनेता सुधाकर वसईकर, रंगकर्मी सुधीर चित्ते, स्वाती नातू, जया पाटील, संयुक्ता राठोड, मंगला कांकणे, सुरेखा गावंडे अशा अनेक रसिक मान्यवर कवींनी स्व कविता सादर केल्या.
तत्काळ सभासद योजनेचा लाभ साहित्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर घेतला. प्रसंगी वाचनालयाचे अॅड. सुरेश पटवर्धन, वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, विजयसिंह परदेशी, बाळकृष्ण धुरी, प्रगती महाविद्यालयाच्या प्रा. मालती पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, वाचक, साहित्यप्रेमी व ग्रंथसेविका आदी उपस्थित होते.
०००००००००००
