नव्या वृक्ष लागवडीचे नियोजन हवे

मुकुंद रांजणे (माथेरान)

माथेरान घाटमाथ्यावर होणारी भरमसाठ वृक्षतोड आता माथेरानच्या मुळावर उठली असून यावर्षी माथेरानमध्ये गर्मीचा उच्चांकी नकोसा विक्रम नोंदला गेला त्यामुळे पुन्हा एकदा वृक्ष संवर्धन हा विषय व त्याचे गांभीर्य समोर आले असून माथेरान मध्ये पुन्हा एकदा वृक्ष लागवड व त्याचे संगोपन व्हावे व तो फक्त दिखावा न करता झाडे जगवण्याकरिता प्रयत्न झाला पाहिजे अशी चर्चा समोर येत आहे.

माथेरान हे थंड हवेसाठी जगप्रसिद्ध मुंबई पुण्यापासूनचे जवळचे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी थंड हवेचा आस्वाद घेण्याकरिता देश विदेशातून अनेक पर्यटक घेत असतात परंतु मागील काही वर्षापासून माथेरान मधील हवामानामध्ये कमालीचा बदल घडलेला असून कधी नव्हे ती जाणवणारी गर्मी माथेरान मध्ये आता शिरकाव करू लागली आहे, यावर्षी तर गर्मीचा उच्चांक झाला असेल प्रथमच येथील तापमान 4०अंश सेल्सिअस वर पोहोचले होते त्यामुळे माथेरान पर्यटन स्थळा करता ही धोक्याची घंटा असून स्थानिकांनी वेळेतच सावध झाले नाही तर येणाऱ्या काळात फक्त माथ्यावरील रान मधले रान निघून जाणार असून माथेच राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

माथेरानच्या चारी बाजूस असणाऱ्या अनेक वाड्यांमधून येथील डोंगर रांगांमध्ये असलेल्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून ही कत्तल रोखण्यासाठी वन विभाग सपशेल अपयशी ठरलेला आहे माथेरान येथून नेरळ कडे जाणाऱ्या डोंगर रांगांना तर जंगलच शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती काही वर्षांमध्ये होणार आहे रोजच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून लाकडे जमा करणारी मंडळी घाटामध्ये दिसत असतात परंतु यावरती कारवाई होत नाही. माथेरान मध्ये नैसर्गिक आपत्तीतून अनेक झाडे उन्मळून पडली आहेत परंतु या झाडांना पर्यायी वृक्षारोपण करून जंगल वाढवण्याचे प्रयत्न अपयशी ठरलेला आहे वनविभाग दरवर्षी वृक्षारोपण करते परंतु यातील किती झाडे जगतात हा संशोधनाचा विषय आहे वृक्षारोपण करणे व त्याचे संवर्धन करणे यामध्ये मोठी तफावत माथेरानमध्ये पहावयास मिळत आहे या वेळेला नवीन वनसंवर्धन समिती होणार असून त्यांच्याकडून तरी यावेळी वृक्षारोपण हा फक्त प्रयोग न करता प्रत्यक्ष झाडे जगण्यावर भर देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माथेरान मध्ये मोठ्या प्रमाणात करंज व इंग्लिश झाडे लावण्यात येतात त्याऐवजी येथील पर्यावरणाला जिवंत ठेवतील अशी झाडेच लावण्यात यावी जेणेकरून येथे पर्यावरण जिवंत राहील अशी मागणी आता स्थानिकांमधून होत आहे.

००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *